एटापल्ली (गडचिरोली) : बांडिया नदीवर अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने नदीपलीकडच्या नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागते. याकडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या गावांतील नागरिक आजही विकासाची आस लावून आहेत.
शासन देशाच्या शेवटच्या टोकावर राहणाऱ्या लोकांच्या विकासाच्या गप्पा मारत असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव काही वेगळेच आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात विकासाची गंगा अद्यापही पोहोचलेली नाही. एटापल्ली तालुक्यातील अशीच दहा गावे विकासाची आस लावून बसली आहेत. पुलाअभावी या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांसाठी या गावातील नागरिकांना झगडावे लागत आहे. प्रशासन व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पूल बांधून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
मूलभूत सुविधांचीही मारामार
एटापल्ली तालुक्यातील कुदरी, मोहुर्ली, हेटलकसा, वेलमगल, पिपरी, बुर्गी, जिजावंडी, इरफानार व इतर दोन गावांमध्ये विकासाची गंगा पोहोचलेली नाही. या गावांमध्ये जाण्यासाठी बांडिया नदी पार करावी लागते. स्वातंत्र्यानंतरही या नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात संबंधित गावांचा तहसील मुख्यालयाशी संपर्क तुटतो. गेल्या सात दशकांपासून येथील नागरिक बांडिया नदीवर पूल बांधण्याची मागणी करत आहेत. आवश्यकतेनुसार विकासाची गंगा संबंधित गावांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे संबंधित गावातील नागरिक विकासासाठी तळमळत आहेत.
या पुलामुळे वाढेल दोन राज्यांतील व्यापार
एटापल्ली तालुक्याला छत्तीसगड राज्य लागून असल्यामुळे या तालुक्याच्या दुर्गम भागातील लोक छत्तीसगडमधील लोकांशी बहुतांश व्यवहार करतात. केवळ बांडिया नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील जनतेला व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बांडिया नदीवर पूल बांधल्यास दोन्ही राज्यातील नागरिकांची सोय होऊन व्यवसाय वाढण्यास मदत होईल, असाही सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.