तहसीलदारांच्या मार्फतीने निवेदन : पोलिसांनी परीक्षांचे कारण केले पुढेआरमोरी : भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात आरमोरी तहसील कार्यालयावर गुरूवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मोर्चास आरमोरी पोलिसांनी पराानगी नाकारल्याने भाकपाच्या पदाधिकाऱ्यांनी आरमोरी तहसीलदारांच्या मार्फतीने मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, एकरी ३० हजार रूपयांची मदत द्यावी, धानाला प्रती क्विंटल ३ हजार ५०० रूपये हमीभाव देण्यात यावा, रोहयोच्या मजुरीचे तत्काळ वाटप करावे, स्वामीनाथ समितीच्या शिफारशी लागू कराव्या, जबरानज्योत धारकांना जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात यावे, पट्टेधारकांना सातबारा देण्यात यावा, शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात यावा, एपीएल धारकांना धान्य द्यावे आदी मागण्यांसाठी भाकपाच्या वतीने आरमोरी तहसील कार्यालयासमोर गुरूवारी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र आरमोरी पोलिसांनी दहावीच्या परीक्षा, शस्त्रबंदी कायदा, कलम ३७ (१) ची कारणे सांगून मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे पक्ष नेत्यांनी मोर्चा न काढताच तहसीलदारांची भेट घेऊन त्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. यावेळी भाकपाचे डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, अमोल मारकवार, हिरालाल येरमे, विनोद बोडणे, अॅड. जगदीश मेश्राम, संजय वाकडे यांच्यासह भाकपाचे पदाधिकारी उपस्थित होते.शेतकरी व शेतमजुरांच्या मागण्यांसाठी भाकपा आंदोलन करीत असतानाही पोलीस विभाग जाणूनबुजून आंदोलनास परवानगी देत नसल्याबद्दल भाकपाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
भाकपाच्या मोर्चास परवानगी नाकारली
By admin | Published: March 18, 2016 1:26 AM