गडचिरोली : राज्य सरकारने युनिफाईड डीसीआरचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पंधराशे स्क्वेअर फुटापर्यंत स्वतःचे घर बांधायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही. तीन हजार स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधायचं असेल तर दहा दिवसांमध्ये परवानगी देणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आढावा बैठकी दरम्यान दिली.
संपूर्ण राज्यात एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) लागू करण्यात आली आहे. या नियमावलीमुळे सर्व शहरांचा विकास सारख्या पद्धतीने होण्यास चालना मिळेल. यामुळे सर्वसामान्यांसाठी घरे स्वस्त होतील. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता. या नवीन नियमावलीमुळे एफएसआयचा गैरवापर थांबेल. मोठ्या प्रमाणावर एफएसआय दिल्यामुळे हाैसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. घरांच्या किमती नियंत्रणात येतील, परवडणारी घरे लोकांना मिळतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
बैठकीला नगरपरिषदा व नगरपंचायतीचे सर्व मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी नगरपालिका नगरपरिषद हद्दीत काय काय प्रश्न ते या बैठकीत मांडले.यातील काही प्रश्न नगर विकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी ताबडतोब सोडवू असे आश्वासन दिले. काही निधीचे विषय होते त्याला देखील प्राथमिकता देण्याचा निर्णय घेतला गेला. काही कामे जिल्हाधिकारी व डीपीडीसीमधून घेतली जाणार आहेत. सर्व नगर परिषदेच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा निर्माण केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, नगर परिषदा व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी उपस्थित हाेते.
शेतकऱ्यांना निर्माण करता येईल रिसाॅर्ट
कृषी पर्यटनाला देखील चालना दिलेली आहे. शेतकरी असेल तर त्याला स्वतःचा रोजगार निर्माण करायचा असेल तर ०.२ एफएसआय होता तो १ एफएसआय पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हॉटेल किंवा रिसॉर्ट जे करायचे ते त्यांना करता येईल. शेतकऱ्यांच्या स्टार ग्रेड हॉटेललासुद्धा तीन पर्यंत एफएसआय दिला आहे. युनिफाईड डीसीआरचा फायदा शहराच्या विकासासाठी, राज्याच्या सुनियोजित विकासासाठी आणि नगरपालिका, महापालिका, नगरपरिषदा यांच्या देखील उत्पन्नामध्ये यामुळे भर पडेल अशा प्रकारच्या युनिफाईड डीसीआरचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागाने घेतला आहे असे एकनाथ शिंदे यांनी संगितले .कृषी पर्यटनाला देखील चालना दिलेली आहे. शेतकरी असेल तर त्याला स्वतःचा रोजगार निर्माण करायचा असेल तर ०.२ एफएसआय होता तो १ एफएसआय पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हॉटेल किंवा रिसॉर्ट जे करायचे ते त्यांना करता येईल. शेतकऱ्यांच्या स्टार ग्रेड हॉटेललासुद्धा तीन पर्यंत एफएसआय दिला आहे.