पं. स. चा भोंगळ कारभार : वाहनधारक त्रस्तएटापल्ली : स्थानिक पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने येथे पेट्रोल व डिझेल पंप सुरू करण्यात आले आहे. मात्र पंचायत समिती प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे या पंपावर अनेकदा पेट्रोल व डिझेल उपलब्ध राहत नाही. या पंपावर पेट्रोल, डिझेल नाही, असा फलक नेहमी झळकत राहतो. त्यामुळे येथे येणाऱ्या वाहनधारकांना परत जावे लागते. सदर नेहमीचाच प्रकार असल्याने एटापल्ली शहर व परिसरातील वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.पंचायत समितीमार्फत चालविण्यात येणारा हा पेट्रोल, डिझेल पंप राज्यातील पहिला सरकारी पंप आहे. या पंपावर तीन दिवसात ३ हजार लिटर डिझेल व पेट्रोलचा खप आहे. मात्र या पंपावर पेट्रोल व डिझेलची गाडी नियमित येत नसल्याने या पंपावर कायम पेट्रोल व डिझेलचा तुटवडा असतो. या पंपावरून अवैध पेट्रोल, डिझेलचा व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक अनेक डब्बे व कॅन भरून पेट्रोल, डिझेल घेऊन जातात. दुर्गम व ग्रामीण भागात सदर व्यावसायिक अधिक दराने पेट्रोल, डिझेलची विक्री करतात. परिणामी दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना पेट्रोल, डिझेल मिळत नाही. उलट एटापल्ली शहरात खुलेआम अवैधरित्या पेट्रोल, डिझेल नेहमी उपलब्ध होते. मात्र पंचायत समितीच्या पंपावर पेट्रोल, डिझेलचा कायम तुटवडा असतो, पंचायत समिती प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डिझेल नियमित उपलब्ध ठेवावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. संपूर्ण तालुक्यात पंचायत समितीचा असलेला हाच एकमेव पंप आहे. त्यामुळे या पंपावर नेहमी वाहनधारकांची मोठी गर्दी असते. शेतकऱ्यांनाही ट्रॅक्टर व इतर कामासाठी डिझेलची गरज भासते. परंतु या पंपावर डिझेल राहत नसल्याने नागरिकांना ३० किमी अंतर जाऊन आलापल्लीवरून पेट्रोल व डिझेल आणावे लागते. कधीकधी भेसळयुक्त डिझेल, पेट्रोल खरेदी करावे लागते. त्यामुळे पंचायत समितीच्या या पंपावर पेट्रोलियम कंपन्यांनी नियमितपणे पुरवठा ठेवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्लीत पेट्रोल, डिझेलचा तुटवडा
By admin | Published: February 10, 2016 1:50 AM