गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात चालू वर्षी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एटापल्ली येथे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून प्रथमच महिला सक्षमीकरणासाठी पिंक बूथ संकल्पना राबविण्यात आली.
एटापल्ली येथील नगर पंचायतच्या १७ प्रभागातून एक जागा अविरोध निवडीनंतर १६ प्रभागात ७४.०४ टक्के मतदान झाले. यात पहिल्यांदाच महिला सक्षमीकरणासाठी पिंक बूथची संकल्पना राबवली गेली. यामध्ये समूह निवासी शाळा खोली क्रमांक २ येथे पहिल्यांदाच सर्व केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच बंदोबस्तासाठी महिलांची नेमणूक करण्यात आली. या उपक्रमात संपूर्ण बूथ, बुथचे प्रवेशद्वार तसेच लक्षवेधी सेल्फी पॉईंटसाठी गुलाबी रंगाचा कपडा, गुलाब फुगे व साहित्य वापरण्यात आले होते. महिला स्टाफ यांनीदेखील गुलाबी पोषाखातच आपले कर्तव्य पार पाडले.
एटापल्ली येथे ७४.०४ मतदान
एटापल्ली शहरात जिल्हा परीषद व समुह निवासी शाळेत ११ बूथ व जिवनगट्टा जिल्हा परीषद शाळेत ३ बूथ तसेच कृष्णार व मरपल्ली येथील जिल्हा परीषद शाळेत प्रत्येकी १ - १ बूथ अशा १६ मतदान केंद्रावर २३५८ महिला व २३७१ पुरुष असे एकूण ४७२९ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वाधिक मतदान प्रभाग क्र. १६ मध्ये ८९.८४ टक्के झाले. तर प्रभाग क्र. ४ मध्ये सर्वांत कमी ४७.६८ टक्के मतदान झाले.
नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी चोख बंदोबस्त कर्तव्य पार पाडले. या अनोख्या उपक्रमाचे उमेदवार, मतदार व सामान्य नागरिक यांनी स्वागत केले तसेच या उपक्रमातून प्रथमच महिला सक्षमीकरणाबाबत निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच सकारात्मक संदेश देण्यात आला.