तळोधी (मो) : चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील गाेविंदपूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी बाजूला माती टाकून रपटा तयार करण्यात आला हाेता. मात्र, यावरून पाणी वाहत असल्याने मागील पाच दिवसांपासून जड वाहनांची वाहतूक ठप्प आहे. कंत्राटदाराने या ठिकाणी पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
गडचिराेली-चामाेर्शी मार्गाचे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. मात्र, हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. याचा माेठा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. गाेविंदपूर गावाजवळ माेठा नाला आहे. या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. वाहने जाण्यासाठी तात्पुरता रपटा तयार करण्यात आला आहे. मात्र, पाणी जाण्यासाठी सिमेंटचे पाईप टाकण्यात आले नाहीत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने पाणी थेट रपट्यावरूनच वाहते. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. नाल्याचे पाणी वाढल्यानंतर पाणी थेट रपट्यावर चढते. यामुळे मागील पाच दिवसांपासून या मार्गावरून जड वाहनांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. आता पाईप टाकण्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे.