लाेकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : शासकीय याेजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दुर्गम भागातील नागरिकांकडे अद्यापही नाहीत. प्रमाणपत्रे व दाखले प्राप्त करण्यासाठी दुर्गम भागातून नागरिकांना तालुका मुख्यालयात पायपीट करावी लागते. यात त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. नागरिकांची ही परवड जाणून लाहेरी उपपाेलीस स्टेशनने ‘पाेलीसदादा लाेरा खिडकी’ हा अनाेखा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन दाखले तसेच प्रमाणपत्र व याेजनांच्या लाभासाठी अर्ज भरण्याची सुविधा केल्याने गरीब वंचित नागरिकांची पायपीट थांबण्यास मदत झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून लाहेरी परिसराची ओळख आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये अद्यापही वीज पाेहाेचली नाही. मूलभूत साेयींचा अभाव आहे. त्यातच एका प्रमाणपत्रासाठी किंवा दाखल्यासाठी नागरिकांना ४० ते ५० किमीची पायपीट करून भामरागड तालुका मुख्यालयात यावे लागते. प्रवास करूनही एका दिवशी काम हाेईल याची शाश्वती नसते. अनेकदा दोन ते चार दिवस ताटकळत राहून मुक्काम ठाेकावा लागताे. तेव्हाच दाखले किंवा प्रमाणपत्रे मिळतात. मानसिक, शारीरिक त्रासासह आर्थिक भारसुद्धा गरीब नागरिकांना साेसावा लागताे. दुर्गम भागातील नागरिकांची ही दयनीय स्थिती पाहून, पाेलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या पुढाकारातून लाहेरी उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी लाहेरी येथे एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. ‘पोलीसदादा लोरा खिडकी’ असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमाची सुरुवात गुरुवार, २५ फेब्रुवारीला प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली. गावातील ज्येष्ठ महिला नागूबाई घोसरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांची पायपीट थांबण्यास मदत हाेणार आहे. याप्रसंगी सीआरपीएफ ३७ बटालीयनचे सहायक कमांडंट संतोष भोसले, पाेलीस निरीक्षक शीतलाप्रसाद, पीएसआय विजय सपकाळ, महादेव भालेराव, आकाश विटे, पाेलीस हवालदार तुकाराम हिचामी उपस्थित हाेते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालू नामेवार, पोलीस नाईक फिरोज गाठले, यशवंत दाणी, वर्षा डांगे, पाेलीस शिपाई मालू पुंगाटी, नितीन जुवारे, संदीप आत्राम, अमित कुलेटी, ईश्वरलाल नेताम, पुरुषोत्तम कुमरे, रेश्मा गेडाम, रत्नमाला जुमनाके, वैशाली चव्हाण, सुजाता जुमनाके, कल्लू मेश्राम, प्रणाली कांबळे, शोभा गोदारी, योगिता हिचामी यांनी सहकार्य केले.
खिडकीतून हाेणार विविध कामे‘पाेलीसदादा लाेरा खिडकी’ या अनाेख्या उपक्रमात लाेरा हा माडिया भाषेतील शब्द वापरण्यात आला आहे. लाेरा म्हणजे यांचा किंवा यांची असा अर्थ हाेताे. या उपक्रमास पाेलीसदादांची खिडकी असेही म्हणता येईल. या खिडकीच्या कक्षात संगणक, इंटरनेट, वायफाय, प्रिंटर, स्कॅनर यासह ऑनलाईन कामांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहेत. येथे मोबाईल रिचार्ज करणे, ऑनलाईन सातबारा, नमुुना- ८, बँक खाते उघडणे, निराधार याेजनांचे अर्ज भरणे, शेतीविषयक कागदपत्रे काढणे तसेच अन्य ऑनलाईन कामे करण्याची सुविधा लाहेरी पाेलिसांनी उपलब्ध केली आहे.