जिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरात एकही राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने येथील नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकेतून एखादे काम करायचे असल्यास ६० किमी अंतरावर असलेल्या तालुकास्थळी जावे लागते.
जिमलगट्टा परिसरात ६०च्या जवळपास गावे आहेत. जिमलगट्टापासून काही गावे पुन्हा ४० किमी अंतरावर आहेत. या गावातील नागरिकांना अहेरी येथे येण्यासाठी सुमारे १०० किमीचे अंतर पार करावे लागते. जिमलगट्टा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक शाखा आहे. या शाखेत ४० किमी व्यासाच्या परिसरातील नागरिकांची शेकडाे बँक खाती आहेत. त्यामुळे या बँकेत सकाळपासूनच नागरिकांची गर्दी राहाते. त्यामुळे सकाळी आल्यानंतर दुपारी उशिरापर्यंत त्यांचे बँकेचे व्यवहार पूर्ण हाेतात. सायंकाळी गावाला जाणे शक्य हाेत नाही. त्यामुळे जिमलगट्टा येथेच मुक्काम करावा लागतो. परिसराचा व्याप व खातेदारांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी पुन्हा एक मध्यवर्ती बँक असणे आवश्यक आहे.
काही कामे राष्ट्रीयीकृत बँकेतूनच पूर्ण हाेतात. मात्र, जिमलगट्टा व परिसरातील एकाही गावामध्ये राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेचे एखादे काम करायचे असल्यास नागरिकांना अहेरी येथे गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. ६० ते १०० किमीचे अंतर गाठून बँकेचे काम करणे व गावाला त्याच दिवशी परत येणे शक्य हाेत नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेशी संबंधित असलेले कामे रखडतात. बॅंकेसाठी अनेकदा नागरिकांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र, दुर्लक्ष झाले आहे.