गुड्डीगुडम, कमलापूर : राजाराम-कमलापूर या मार्गावर अहेरी आगाराची बस सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
अहेरी येथून राजारामसाठी मागील अनेक वर्षांपासून बसफेरी सुरू हाेती. मात्र राजाराम खांदला या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून गाेलाकर्जी-राजाराम-कमलापूर-रेपनल्ली या मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या हाेत्या. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबराेबर लाॅकडाऊनमध्येसुद्धा शिथिलता देण्यात आली आहे. तसेच शाळा, महाविद्यालयेसुद्धा सुरू झाली आहेत. त्यामुळे बस सुरू हाेणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत या मार्गाने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना अहेरी येथे जावे लागते. ही बसफेरी नागरिकांसाठी साेयीची हाेती. सकाळी अहेरी येथे पाेहाेचून सायंकाळच्या बसने घराकडे परत येत हाेते. आता मात्र, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अहेरी, आलापल्ली येथे जाण्यासाठी मानवविकास मिशनची आवश्यकता आहे. ही बस अजूनपर्यंत साेडण्यात आली आहे.
बाॅक्स...
सहा किमीची पायपीट केल्यानंतरच मिळते वाहन
राजाराम मार्गावरील बसफेऱ्या बंद केल्याने नागरिकांना तालुका मुख्यालय किंवा जिल्हा मुख्यालय तसेच इतर ठिकाणी जायचे असल्यास ६ किमी पायी जाऊन गाेलाकर्जी गाव गाठावे लागते. त्यानंतरच पुढचा प्रवास करता येतो. बस सुरू केल्यास नागरिकांसाठी साेयीचे हाेईल. तसेच एसटीलाही उत्पन्न मिळेल.