भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात.
कव्हरेज खंडित
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने, परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.
औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
देसाईगंज : गडचिरोली शहरातील बहुतांश औषध विक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाहीत. दहा गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. मात्र, ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते.
निवासस्थाने निरुपयाेगी
आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. येथील अनेक वन कर्मचाऱ्यांच्या इमारती ओसाड दिसून येतात.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत, तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. अतिक्रमण काढल्यास रहदारी सुरळीत हाेईल.
पथदिवे झाकाेळले
आष्टी : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकोळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्या, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.
थ्री-जी सेवा नावापुरतीच
कुरूड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिले जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.