लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : ‘वैनगंगा व गाढवी नदीतून रेती तस्करी’ अशी बातमी ‘लाेकमत’ने १७ डिसेंबर राेजी प्रकाशित करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. देसाईगंज येथील वैनगंगा नदीघाटावरील जुनी वडसा घाट व इतरही घाटांवर जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खाेदले आहेत. सध्यातरी ह्या घाटांवरील रेती तस्करी बंद झालेली आहे. तालुक्यात वैनगंगा व गाढवी या दोन नद्या आहेत. यापैकी वैनगंगा नदी परिसरात शहरी विभाग तसेच मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची गावे जवळ पडत असल्याने शासकीय कामांपासून ते घरबांधणीपर्यंत याच नदीची रेती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मागील दोन वर्षांपासून वैनगंगा नदीवरील कोंढाळा, जुनी वडसा, आमगाव, सावंगी या रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत. या संधीचा फायदा परिसरातील रेती तस्करांनी घेतला. ते अल्पावधीतच गर्भश्रीमंत होऊन मालामाल झाल्याचे वास्तव आहे. हे तस्कर रेतीचे वेगवेगळ्या भागात डम्पिंग करुन गरजवंतांना मनमानी भावात विकतात. याबाबत ‘लोकमत’ने दि. १७ डिसेंबर राेजी ‘वैनगंगा व गाढवी नदीच्या पात्रातून रेती तस्करी’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. त्यानंतर गडचिराेलीपासूनची यंत्रणा कामाला लागली. रेतीघाटांची पाहणी केली असता, रेती तस्करी होत असल्याचे दिसले. देसाईगंज तालुका महसूल विभागाने तातडीचे पाऊल उचलत कोंढाळा, कुरुड, आमगाव, सावंगी या रेती घाटांवर मार्ग तीन ते चार फुटांचे खड्डे खोदले. या घाटातून ट्रॅक्टर, बैलगाडी यांचे आवागमन होणार नाही, असे करुन ठेवले आहे.
दंडाबराेबरच गुन्हा दाखल करावामहसूल विभागामार्फत ट्रॅक्टर पकडून जवळपास सव्वा लाख रूपयांचा दंड आकारला जात असला, तरी रेती तस्कर एका रात्रीतून ३० ते ४० हजार रूपये कमावत असल्याने ते या दंडालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्यांच्यावर पाेलिसात गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.