ठाणेगाव : वनखी येथील खोब्रागडी नदीच्या रेती घाटाकडे ये-जा करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे पाणंद रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी आतापासून सुरुवात आवश्यक आहे.
मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
धानोरा : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मधसंकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. परंतु याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
ओपन स्पेस बनले कचऱ्याचे केंद्र
देसाईगंज : प्रत्येक वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपस स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे. नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात स्वच्छतेचे काम मंदावल्याचे दिसते.
‘त्या’ विद्युत खांबाने धाेका
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले. नागरिकांनी आंदाेलनाचा इशारा दिला.
मोहझरीतील रस्ते खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नाही.
दुधाळ गायींचे वाटप करा
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना दुधाळ गाईचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.
रोहित्रांचा धोका वाढला
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.
कुरखेडा तालुक्यातील गावांना लाईनमनच नाही
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राईसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.
सातबारा मिळेना
वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र सदर पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबारापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी आहेत. सातबारा नसल्याने कृषी याेजनांचा लाभ मिळत नाही.
पुलावरून खडतर प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.
कव्हरेजचा अभाव
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. अतिदुर्गम भागात कव्हरेजच्या नावाने बाेंब हाेत आहे.
योजनांबद्दल अनभिज्ञता
भामरागड : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
बँकांअभावी अडचण
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील अनेक ग्राहक २० ते २५ किमीची पायपीट करतात.
मयालघाट गाव दुर्लक्षित
काेरची : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मयालघाट गावात अजूनही भाैतिक साेयीसुविधा पाेहाेचल्या नाहीत. गाेदिंया, गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव वसले आहे. या ठिकाणी चवथीपर्यंत शाळा आहे. हे गाव जंगलाने वेढले आहे. त्यामुळे हे गाव दुर्लक्षित असल्याने गावात साेयी-सुविधा पुरविण्याची मागणी आहे.
कुटीर उद्याेग पूर्वपदावर
गडचिराेली : जिल्ह्यात शेतीवर आधारित अनेक कुटीर उद्याेग आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत हे सर्व उद्याेग बंद पडले हाेते. अनलाॅकची प्रक्रिया राबविल्यानंतर आता हे कुटीर उद्याेग पुन्हा सुरू झाले आहेत. या कुटीर उद्याेगांची उलाढाल वाढली आहे. त्यामुळे राेजगार निर्मिती हाेत आहे.
टिल्लू पंपाचा सरार्स वापर
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दिवसातून दोनदा नळ पाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र रामनगर, स्नेहनगर परिसरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांच्या घरामधील नळातील पाणी प्रवाह कमी होतो. अनेकांना पुरेसे पाणीही मिळत नाही.
रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील आंबेशिवणी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
पाेर्लात फवारणी करा
गडचिरोली : नजीकच्या पाेर्ला येथील अनेक वाॅर्डातील अनेक नाल्या साचल्या आहेत. तसेच परिसरात मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाॅर्डातील नागरिकांना डासांचा त्रास होत आहे. त्यामुळे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गावातील काही भागात नाल्या तुंबल्याचे दिसून येते.
माेकाट कुत्र्यांमुळे धाेका
एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर पंचायतीकडे केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येते.
कठडे लावण्यास दिरंगाई
चामोर्शी : अनेक पुलावर अद्यापही कठडे लावण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या सुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. कठडे नसल्याने अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.