वैरागड : सिद्धिविनायक, ऋद्धिविनायक, बुद्धिविनायक व शक्तिविनायक अशी भिन्नता गणेशभक्त गणरायाच्या रुपात करतात. उजव्या साेंडेचा म्हणजेच सिद्धिविनायक तसा अनाेखाच; परंतु विदर्भातील अष्टधामांपैकी एक असलेला उजव्या साेंडेचा गणपती वैरागड येथील भंडारेश्वर मंदिर टेकडीच्या पायथ्याशी शेकडाे वर्षांपासून विराजमान आहे.
या गणपतीचे सोंड मध्यापासून उजवीकडे वळले आहे. मनाेकामना पूर्ण हाेत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने दिवसेंदिवस सिद्धिविनायकावरील भाविकांची अपार श्रद्धा वाढत आहे. आध्यात्मिकदृष्ट्या महाराष्ट्रात अष्टविनायकांचे फार महत्त्व आहे. उजव्या सोंडेच्या म्हणजेच सिद्धिविनायकाच्या उपासनेचे फळ मिळते, अशी भक्तांची नितांत श्रद्धा आहे.
चार विनायकात सिद्धिविनायक महत्त्वाचा आहे. त्याच दृष्टीने विदर्भातील अष्टधामांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे देखील अष्टविनायकाची स्थापना केलेली आहे. वैरागडला पाैराणिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे; परंतु स्थानिक व भाविक याबाबत अनभिज्ञ आहेत, असे शिवभक्त दिलीप मोटवानी यांनी सांगितले.
(बाॅक्स)
अर्धनारी नटेश्वरासह एकदंतही विराजमान
खाेब्रागडी नदीच्या तीरावर असलेल्या टेकडीवर भंडारेश्वर मंदिर आहे. मंदिरात अगदी प्रारंभी गणेशाच्या मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात शिव-पार्वती, मंदिराच्या उर्वरित तिन्ही बाजूला अर्धनारी नटेश्वर मूर्ती, विष्णूची मूर्ती आणि एका बाजूला विजय गणपतीची मूर्ती आहे. पवणीचा धुंडिराज, दंतेश्वर (छत्तीसगड), एकदंत वैरागडचा उजव्या सोंडेचा गणपती आदी तिन्ही मूर्ती पूर्वीपासून सुप्रसिद्ध आहेत. छत्तीसगडचा काही भाग संयुक्त महाराष्ट्रात होता तेव्हापासूनच या मूर्ती प्रसिद्ध आहेत.
(बॉक्स)
मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व
विशेष म्हणजे, बाराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरकालीन शिलालेखात वैरागडचा उल्लेख सापडतो. त्या काळात आढळणाऱ्या हिऱ्याच्या खाणीला वज्रगर म्हणत असत. दरम्यानच्या काळात वैरागड येथे हिऱ्याची खाण आढळली होती. हिऱ्याच्या खाणीच्या संरक्षणार्थ तत्कालीन राजा बल्लाळशाहने वैरागड येथे किल्ला बांधला. राजा बल्लाळशाहची भावसून हिराईदेवीने आपल्या नवऱ्याच्या स्मरणार्थ भंडारेश्वराचे मंदिर बांधले. हिऱ्याच्या खाणीचा म्हणजेच वज्रगरचा अपभ्रंश होऊन वैरागड असा नामाेल्लेख केला जाऊ लागला. पाैराणिकदृष्ट्याही वैरागडचे महत्त्व वाढून विदर्भातील अष्टधामांपैकी भंडारेश्वर मंदिर हे एक धार्मिक स्थळ बनले.