वृक्ष लागवडीचे फलक कायम रोप नष्ट
वैरागड : ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून मोठा गाजावाजा करून ही मोहीम राबविण्यात आली त्यात वनविभागाने किमान आपले ५० टक्के तरी रोप जगवले. उर्वरित स्थानिक स्वराज्य, संस्था बांधकाम विभाग, रोजगार हमी योजना या विभागाने केवळ वृक्षलागवडीचा देखावा निर्माण केला. ज्या ठिकाणी रोप लावले ती जागादेखील आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही. आरमोरी तालुक्यातील वैरागड, कढाेली, देलनवाडी, मानापूर, डोंगरतमासी, वडेगाव, मेंढा आदी भागांत दाेन वर्षांपूर्वी लावलेली झाडे आता नष्ट झाली आहेत.
मागील चार-पाच वर्षांत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनविभाग व इतर यंत्रणांनी नको त्या ठिकाणी वृक्षलागवड करून केवळ वृक्ष लागवडीचा देखावा निर्माण केला. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने तर वृक्षलागवडीची हद्दच केली. ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या चांगले जंगल आहे त्या जंगलातून जाणारे डांबरी रस्ते, पाणंद रस्ते, पायवाटा यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले. ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उभे जंगलच अस्तित्वात होते त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची कोणत्या सुपीक डोक्यातील कल्पना होती, कोण जाणे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्हणजे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, बांधकाम विभाग, रोजगार हमी योजनाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. त्यातील १० टक्के वृक्ष जिवंत स्थितीत नाहीत. वनविभाग वगळता इतर यंत्रणांनी लावलेले वृक्ष भुईसपाट झाले आहेत. रस्त्याच्या कडेला लावलेले वृक्ष जिवंत राहत नाही. असा दरवर्षीचा अनुभव असताना देखील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण का केले जाते, असा प्रश्न आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, कढाेली, देलनवाडी, मानापूर, डोंगरतमासी फाटा ते वडगाव, मेंढा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दोन वर्षांपूर्वी झाडे लावली होती त्यातील २५ टक्केही झाडे जिवंत नाहीत.