कृषी विभागाचे निर्देश : प्रत्येक यंत्राला ५० हेक्टरचे उद्दिष्टगडचिरोली : मानव विकास मिशन, आदिवासी विकास विभाग व डीपीडीसी यांच्या मार्फतीने गडचिरोली जिल्ह्यात १३० बचत गटांना रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. या यंत्रांचा खर्च भरून निघण्यासाठी प्रत्येक यंत्राच्या मार्फतीने किमान ५० हेक्टर क्षेत्र धान रोवणीचे उद्दिष्ट राज्याच्या कृषी यांत्रिकी विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षी जिल्हाभरात किमान १० हजार हेक्टरवर यंत्राने धानाची रोवणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते. धानाच्या रोवणीदरम्यान मजूर मिळत नाही. त्यामुळे धान रोवणीला विलंब होते व उत्पादनात कमालीची घट होते. मजूर मिळत नसल्याने दामदुपटीने मजुरी द्यावी लागते. या सर्व अडचणींपासून मुक्तता करण्याच्या उद्देशाने बचत गटांना रोवणी यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात जिल्हाभरात १३० यंत्रांचे वितरण बचत गटांना करण्यात आले. धान रोवणीच्या दिवसातच या यंत्रांचा उपयोग होतो. उर्वरित ११ महिने सदर यंत्र रिकामे पडून राहतात. त्यामुळे या एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण शक्तिनिशी वापर या यंत्रांचा होणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांत ५० हेक्टरपेक्षाही कमी रोवणी प्रत्येक यंत्राच्या साहाय्याने झाली असल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे रोवणी यंत्राचा खर्च भरून निघाला नाही. उलट काही गटांना तोट्याचा सामना करावा लागला. ही परिस्थिती कायम राहिल्यास बचतगट आर्थिक अडचणीत येतील, ही बाब लक्षात घेऊन रोवणी यंत्रांच्या साहाय्याने किमान ५० हेक्टर क्षेत्रावर रोवणी करण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कृषी यांत्रिकी विभागाने दिले आहेत. धानाची रोवणी करण्यासाठी कृषी सहायकांनी संबंधित गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, मॅट नर्सरी कशी तयार करावी, याबाबत मार्गदर्शन करावे, असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी सहायक आता रोवणीची मशीन असलेल्या गावामध्ये फिरून शेतकऱ्यांना यंत्राच्या सहाय्याने रोवणी करण्याचे मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे यावर्षी यंत्राच्या साहाय्याने धान रोवणीचे क्षेत्र वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)नवीन यंत्रासाठी अनुदान नाहीमागील दोन वर्षांत मानव विकास मिशन, डीपीडीसी व आदिवासी विकास विभाग यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे जिल्हाभरात अनुदानावर १३० बचतगटांनी रोवणी यंत्र खरेदी केले होते. मात्र यावर्षी तिन्ही योजनांतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे एकाही शेतकऱ्याने यावर्षी धान रोवणी यंत्र खरेदी केले नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या यांत्रिकीकरणास ब्रेक बसला आहे. भविष्यातही यासाठी अनुदान दिले नाही तर रोवणी यंत्र शेतकरीवर्ग खरेदीच करू शकणार नाही.वापराच्या कौशल्याचा अभावबचत गटांना धान रोवणी यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. अनेक बचत गटांनी ५० टक्के व १०० टक्के अनुदानावर यंत्र मिळत असल्याने खरेदी केले आहे. मात्र या यंत्राचा पूर्णशक्तिनिशी वापर करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नाही. या यंत्राचा वापर करण्यात कौशल्यपूर्ण व्यक्ती उपलब्ध नाही. एका दिवशी किमान तीन ते साडेतीन एकर धानाची रोवणी होणे आवश्यक आहे. मात्र यंत्र हातळण्याचे कौशल्य नसल्याने दिवसभरातून एक ते दीडच एकर क्षेत्रावर रोवणी होत असल्याचे दिसून आले आहे. पऱ्हे मोठे किंवा योग्य नसल्यानेही धान रोवणीत अडचण निर्माण होत आहे. गडचिरोलीत प्रशिक्षणयंत्राचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर व्हावा, यासाठी गडचिरोली येथे धान रोवणी यंत्र खरेदी केलेल्या बचत गटांच्या सदस्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. प्रत्येक बचत गटातील किमान दोन व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पऱ्हे टाकण्यापासून ते धान रोवणीपर्यंतची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी पुढील आठ दिवसांत प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. सदर प्रशिक्षण पोटेगाव मार्गावरील बांबू डेपोजवळ आयोजित केले आहे.
१० हजार हेक्टरवर यंत्राने धान रोवणी
By admin | Published: June 04, 2016 1:14 AM