लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : पावसाने उसंत दिली असली, तरी संततधार पावसामुळे दुर्गम भागातील नाल्यांमधील पूर ओसरलेला नाही. यामुळे पूल नसलेल्या नाले ओलांडताना कसरतच करावी लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार भामरागड तालुक्यात रविवारी घडला. ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेला नाल्याच्या पुरातून बोटीने रेस्क्यू करून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात सुखरूप पोहोचविण्यात आले. पुरामुळे गर्भवती तसेच जखमी रुग्णांचे हाल होण्याचे सत्र सुरूच आहे.
भामरागड तालुक्यातील कुचेर येथील शीला सडमेक या ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेचे प्रसूती दिवस अगदी जवळ आल्याने तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. दरम्यान, पावसामुळे इरपनार गावाजवळील नाला तुडुंब भरून वाहत होता. गरोदर महिला आपल्या पतीसह मोटारसायकलने रुग्णालयात जाण्यासाठी निघाली; परंतु इरपणार गावाजवळचा नाला तुडुंब भरून वाहत होता. नाला ओलांडून रुग्णालयात पोहोचणे शक्य नव्हते. ही माहिती तहसीलदार किशोर बागडे यांना देण्यात आली. तेव्हा त्यांनी तत्काळ नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार यांच्यावर जबाबदारी सोपवून महिलेचा रेस्क्यू करण्यास सांगितले. पुप्पलवार यांनी नगरपंचायत व तहसीलची बोट उपलब्ध केली.
"इरपणार व कुचेर हा भाग नक्षलग्रस्त आहे. यामुळे त्या भागात एसडीआरएफ जवानांची चमू रेस्क्यूसाठी नेणे धोक्याचे ठरले असते. यासाठी आम्ही सतर्कता बाळगून नगर पंचायत व तहसीलमधील बचाव पथकाद्वारे रेस्क्यू केला व तो सफलसुद्धा झाला."- प्रकाश पुप्पलवार, नायब तहसीलदार
"कुचेर येथील गर्भवती शीला सडमेक ही सध्या सुखरूप आहे. प्रसूतीसाठी काही दिवस अवधी आहे. तिच्या प्रकृतीची काळजी महिला कर्मचारी घेत आहेत. आतापर्यंत अनेक गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती करण्यात आली."- डॉ. भूषण चौधरी, वैद्यकीय अधिकारी