चौकशीही रखडली : गणपूर रेतीघाटावरील अवैध उपसा प्रकरणचामोर्शी : तालुक्यातील गणपूर रेती घाटावर पोकलँड मशीनद्वारे रेतीचा उपसा लिलाव होण्याआधीच करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. गणपूर रेती घाटाचा ११ डिसेंबर २०१५ ला लिलाव झाला. १६ जानेवारी २०१६ ला ताबा देण्यात आला. ताबा मिळण्यापूर्वीच पोकलँड मशीनद्वारे मोठ्या प्रमाणावर रेती उपसा करून ट्रकद्वारे त्याची बाहेर जिल्ह्यात वाहतूक करण्यात आली. गणपूर परिसरात नदीलगत माती व मुरूमाचे उत्खनन करून नदीपात्रात रस्ता तयार करण्यात आला, असेही दिसून येत आहे. या संदर्भात तहसीलदार वैद्य यांना विचारणा केली असता, लिलाव होण्यापूर्वी तसेच लिलावधारकास ताबा देण्याच्या पूर्वीच येथून अवैध वाहतूक झाली आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी २७ जानेवारीला नायब तहसीलदार एस. टी. खंडारे, मंडळ अधिकारी पी. एम. बोदलकर, घोटचे मंडळ अधिकारी. एस. व्ही. सरपे, तलाठी एन. एस. अतकरे यांची चौकशी समिती गठीत करून त्यांना अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु १० दिवस उलटूनही चौकशी अहवाल सादर केलेला नाही. चौकशी समितीचे प्रमुख नायब तहसीलदार एस. टी. खंडारे यांना विचारणा केली असता, माझ्याकडे दोन विभाग असल्याने येनापूरचे मंडळ अधिकारी कुमरे यांना चौकशी करण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले तर मंडळ अधिकारी पी. एम. बोधलकर यांनी सोमवारी चौकशी करू, असे लोकमतला सांगितले. एकूणच या प्रकरणात महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड चालढकलपणा चालविलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)
लिलावापूर्वी पोकलँडने रेती उत्खनन
By admin | Published: February 06, 2016 1:27 AM