गडचिरोली : मौशीखांब-मुरूमाडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या अमिर्झा गावाजवळ निलकंठ साखरे यांच्याकडे निवडणूक पथकाला २८ हजार रूपयांची रोकड मंगळवारी आढळून आली आहे. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत निलकंठ साखरे यांची चौकशी निवडणूक पथकाकडून केली जात होती. निलकंठ साखरे हे मौशीखांब-मुरमाडी क्षेत्रातील भाजपच्या उमेदवार निता निलकंठ साखरे यांचे पती असून ते सरकारी नोकरीमध्ये असल्याची माहिती आहे. निलकंठ साखरे हे मौशीखांबवरून अमिर्झा येथे मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी जात असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला फोनद्वारे मिळाली. त्यानुसार निवडणूक भरारी पथकाने अमिर्झा गावाजवळ सापळा रचला. मौशीखांबवरून अमिर्झाकडे येणाऱ्या दुचाकीला थांबवून चौकशी केली असता, सदर दुचाकी निलकंठ साखरे चालवित होते. त्यांच्या दुचाकीमागे उंदीरवाडे नामक एक व्यक्ती बसला होता. साखरे यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे दोन हजार रूपयांच्या १४ नोटा आढळून आल्या. त्यानंतर निवडणूक पथकाने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. भरारी पथक प्रमुखांनी याबाबतचा एफआयआर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. रात्री उशीरापर्यंत साखरे यांची चौकशी सुरू असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता. निलकंठ साखरे यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती गडचिरोली तहसील कार्यालयाचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. (नगर प्रतिनिधी)
अमिर्झा परिसरात पोलिसांनी पकडली २८ हजारांची रोकड
By admin | Published: February 15, 2017 1:29 AM