गडचिरोली: आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दारूमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलिस स्टेशन ॲक्शन मोडवर आले असून दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, पाेलिसांनी १८ फेब्रुवारी राेजी रविवारला सकाळी शहरातील फुले वॉर्डात कारवाई करत सव्वा दाेन लाखांची दारू नेणारी कार पकडली.
दारू विक्रेत्याकडील एकूण ७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील दारु विक्रेता दिनेश गिरीधर मोहुर्ले (३२) रा. फुले वॉर्ड हा पळून जाण्यात यशस्वी झाला. गडचिरोली शहर पोलिसांच्या डीबी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली धनंजय चौधरी, अविनाश लंजे, वृषाली चव्हाण, भाऊराव बोरकर यांनी ही कारवाई केली.
किरकाेळ विक्रेत्यांना पोहोचण्यासाठी दारूची तस्करीदिनेश मोहुर्ले हा शहरातील चिल्लर विक्रेत्यांना कारच्या साहाय्याने दारू पोहोचवित होता. याची गोपनीय माहिती गडचिरोली शहर पोलिसांना मिळाली. त्याआधारे डीबी पथकाने शहरातील फुले वॉर्डात सापळा रचला. दरम्यान, सर्वोदय वॉर्डातून रायपुरे चौकाकडे एक कार संशयास्पदरित्या येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता कारमध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी २ लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या देशी दारूचे ३९ बॉक्स आणि एमएच ३१ ईके -१३७४ क्रमांकाची ४ लाख ८० हजार रुपये किंमतीची कार असा एकूण ७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आगामी काळात विविध सणांसोबतच लोकसभा निवडणुक होणार आहे. अशा परिस्थितीत पोलिस स्टेशन परिसरात दारूविक्रीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सण व निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी शहर पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सदर माेहिमेला आणखी गती देण्यात येणार आहे. - अरूण फेगडे, पाेलिस निरीक्षक, गडचिरोली