गडचिरोली : तुला अवैध दारू विक्री करण्यास मुभा हवी असेल तर कोंबडा, दारूची बाटली (बंपर) आणि सुंदर बाईची व्यवस्था कर, अशी मागणी जिमलगट्टा पोलीस ठाण्यातील एका शिपायाने केल्याची तक्रार अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील एका व्यक्तीने अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यासोबतच जिमलगट्टा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आपल्याला जबर मारहाण झाल्याचा आरोप त्याने केला आहे.
गुलाब विठ्ठल देवगडे (वय ३०) असे त्या तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्याच्या तक्रारीनुसार गेल्या २९ एप्रिल रोजी रेपनपल्ली उपपोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकांनी फोन करून जिमलगट्टा एसडीपीओ यांना भेटण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतर देवगडे यांना कोणत्या अधिकाऱ्याला किती रुपये देऊन अवैध दारू विक्रीचा धंदा करत आहेस, असे म्हणून शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर सुजलेल्या हातावर लावण्यासाठी मलमही दिला. त्यानंतर पुन्हा प्रश्नांची सरबत्ती करून माहिती काढण्याचा प्रयत्न केल्याचे देवगडे यांनी म्हटले.
मारहाण आणि शिपायाच्या मागणीमुळे आपला शारीरिक आणि मानसिक छळ झाला असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनाही दिली.
‘तो’ शिपाई कोण?
जिमलगट्टा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका शिपायाने देवगडे यांना बाई-बाटलीच्या बदल्यात अवैध दारू विक्री करण्याची सूट देण्याबाबत केलेल्या वक्तव्याने देवगडे चक्रावून गेले. त्या शिपायाने संपर्कासाठी आपला मोबाईल नंबरही दिला. अशा शिपायावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.