अम्ब्रीशराव आत्राम यांचे प्रतिपादन : पोलीस पाटलांच्या कार्यशाळेत मार्गदर्शिकेचे विमोचनगडचिरोली : दुर्गम व नक्षलग्रस्त गावाचा विकास करण्याबरोबरच गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस पाटलांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले. पोलीस पाटलाला गावामध्ये आजही मानाचे स्थान असून हा मानसन्मान कायम ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी गावाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. पोलीस मुख्यालयात मंगळवारी जिल्हाभरातील पोलीस पाटलांचे चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजितकुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्रकाश गेडाम, अनिल करपे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांना मार्गदर्शक ठरू शकेल, यासाठी ‘पोलीस पाटील मार्गदर्शीका’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सदर पुस्तिका प्रत्येक पोलीस पाटलाला देण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हाभरातील जवळपास दीड हजार पोलीस पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या परंपरेनुसार गावातील पहिला व्यक्ती हा पोलीस पाटील आहे. पोलीस पाटलाला जेवढा मानसन्मान मिळतो, तेवढा मानसन्मान सरपंच व किंवा ग्रामपंचायत सदस्यांनाही मिळत नाही. प्रत्येक पोलीस पाटलाने स्वत:ची जबाबदारी समजून घ्यावी, असे सांगितले. जिल्हाधिकारी रणजितकुमार म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस पाटील हे पद सांभाळताना पोलीस पाटलांना फार मोठी जोखीम उचलावी लागते. तरीही या जिल्ह्यातील पोलीस पाटील अत्यंत चांगले काम करीत आहे. नक्षल्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना घरकूल किंवा जमीन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले की, पोलीस पाटलांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील पोलीस पाटील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, संचालन पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार तर आभार पोलीस उपनिरिक्षक पालवे यांनी मानले.
विकासात पोलीस पाटलांचा वाटा मोठा
By admin | Published: February 10, 2016 1:31 AM