लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ज्या तरुणांनी कधी जिल्ह्याच्या बाहेरची दुनिया पाहिली नाही त्या दुर्गम भागातील १४० होतकरू बेरोजगार युवकांना हैदराबादसारख्या शहरात सुरक्षा रक्षकाची नोकरी लावून देण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे त्या युवकांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळणार असून दुर्गम भागातील नागरिकांना आर्थिक विकासाचा नवीन आशेचा किरण यानिमित्ताने दिसणार आहे.पोलीस विभाग आणि एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) पोलीस विभागाच्या सभागृहात त्या निवड झालेल्या युवकांचा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या काऱ्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (अभियान), अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) अपर पोलीस अधीक्षक समय्या मुंडे (प्राणहिता, अहेरी) तसेच एम्स प्रोटेक्शन सर्व्हिस कंपनीचे संचालक मल्लेश यादव उपस्थित होते. जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाने रोजगार मेळावा ॲप तयार केले. या ॲपच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांनी नाव नोंदणी केली. त्यानुसार जिमलगट्टा, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, गडचिरोली आदी उपविभागांतर्गत येणाऱ्या दुर्गम गावांमधील १४० बेरोजगारांना हैदराबादच्या एजन्सीत सुरक्षा रक्षक म्हणून संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनीही आनंद व्यक्त केला. या काऱ्यक्रमासाठी संबंधित उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांसल नागरी कृती शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विकासासाठी ठरणार मैलाचा दगडनक्षलवादी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे आणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांची दिशाभूल करून दलममध्ये भरती करून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे अनेक तरुण गुणवत्ता असूनही रोजगारापासून वंचित राहीले आहेत. पण त्या तरुणांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी पोलीस अधीक्षक गोयल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात राबविला गेलेला हा उपक्रम नक्षलविरोधी अभियानासाठी आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासाला चालना देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर असलेली बेराेजगारीची समस्या आणि त्याचा नक्षलवाद्यांकडून घेतला जाणारा गैरफायदा टाळण्यासाठी पाेलीस विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे स्वागत हाेत आहे.