संजय तिपाले
गडचिरोली : भोवताली घनदाट झाडी. अतिदुर्गम भाग. गावात माणसाला माणूस सहज दिसतो पण इथं तसं नाही. ताडपत्रीचे तंबू लावून पोलिस मदत केंद्र बनले आणि हेच आमचे घर झाले. या परिसरातून बाहेर जायची परवानगी नाही. कारण कधी नक्षल्यांची गोळी चाटून जाईल नेम नाही. येथे ना कुणाचा कॉल येत ना मेसेज जात... ही कथा आहे दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून नक्षल्यांचा मुकाबल्यासाठी सज्ज जवानांची. एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथे १५ जानेवारीला एका दिवसात पोलिस मदत केंद्राची उभारणी केली. येथील जवानांचा संघर्ष ‘लोकमत’ने जाणून घेतला.
अतिदुर्गम वांगेतुरी व गर्देवाडा ही नक्षल्यांच्या हिटलिस्टवर असलेेली पोलिस मदत केंद्रे आहेत. चिकटूनच अबूझमाड हे नक्षल्यांचे आश्रयस्थान म्हणून परिचित असलेली जंगलपहाडी आहे. येथे घनदाट जंगलात ताडपत्रीचे तंबू लावून हे केंद्र उघडण्यात आले. तंबूतच राहायचे, तेथेच जेवण करून झोपायचे आणि नक्षल्यांचा मुकाबला करण्यासाठी २४ तास सज्ज राहायचे असा जवानांचा दिनक्रम. शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आधी वांगेतुरी व नंतर गर्देवाडा येथे भेट देऊन जवानांच्या धाडसाचे कौतुक केले.
काही दिवसांपूर्वीच झाली चकमक
वांगेतुरी आणि गर्देवाडा हा परिसर छत्तीसगड सीमेवर असल्याने नक्षल्यांचे प्रवेशद्वार समजला जातो. या परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने काही दिवसांपूर्वी नक्षल्यांनी रेकी करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर चकमकही उडाली होती. त्यामुळे येथे अलर्ट राहावे लागते. शासनाकडून आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविल्या जातात, असे जवान सांगतात.
गडचिरोलीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवान नक्षलवादाविरोधात लढत आहेत. गर्देवाडासारख्या अतिदुर्गम ठिकाणी पायाभूत सुविधांची अडचण आहे. दोन मोबाइल टॉवर उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जवानांना तात्पुरत्या स्वरूपात सर्व त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांमध्ये आणखी वाढ केली जाईल.
- रश्मी शुक्ला, पोलिस महासंचालक
झाडे करतात बचाव
गर्देवाडा येथे घनदाट झाडी असलेल्या ठिकाणी तंबू रोवून पोलिस मदत केंद्र सुरू केले. पक्क्या इमारतीचे बांधकाम हाती घेतले आहे. तूर्त एकही झाड तोडलेले नाही. ही झाडे नक्षल्यांच्या सशस्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी फायद्याची ठरत आहेत, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.