गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा झाल्यानंतर रात्री महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टणम् येथे नक्षली व जवानांमध्ये चकमक उडाली. नक्षलवाद्यांनी आधी पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले. यानंतर सी- ६० पथकातील २०० जवान व डीआरजीच्या ७० कमांडोंनी आक्रमक पवित्रा घेत नक्षल्यांचा तळ उध्दवस्त केला.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाल्यानंतर रात्री छत्तीसगडच्या उत्तरेला बिजापूरच्या भोपाळपट्टणम (छत्तीसगड) येथे सँड्रा येथे काही नक्षली तळ ठोकून होते, अशी माहिती गडचिरोली पोलिस दलाला मिळाली. त्यानुसार, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी बिजापूर येथील पोलिस अधीक्षकांना संपर्क केला. अहेरीचे अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २०० सी-६० जवान रवाना केले. बिजापूरचे सहायक अधीक्षक व ७० डीआरजी (जिल्हा रिजर्व गार्ड) कमांडो यांच्या संयुक्त पथकाने कोम्बिंग ऑपरेशन केले. यावेळी नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला ज्याला संयुक्त पोलीस पथकांनी प्रत्युत्तर दिले.
पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाल्यानंतर, त्यानंतर केला. पोलिसांनी गोळ्या चुकवून नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी संपूर्ण नक्षली तळाची झडती घेऊन तो उध्दवस्त केला. यावेळी नक्षली पळून गेेले. मात्र, तेथे नक्षली साहित्यासह मोबाइल, ताडपत्री, भांडी असे संसारोपयोगी साहित्य आढळले. हे साहित्य जप्त केले आहे.
गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु
संयुक्त पथक मध्यरात्री सुरक्षितपणे भोपालपट्टणम कॅम्प येथे पोहोचले. बिजापूरच्या भोपालपट्टणम् पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवर नक्षल्यांचा काय कट होता, याची माहिती आता तपासातच समोर येणार आहे.