लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात पोलीस विभागासाठी सर्वाधिक धोकादायक क्षेत्र म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील सेवेकडे पाहिले जाते. कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीसाठी सदैव तत्पर राहाव्या लागणाऱ्या येथील पोलीस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा हा खडतर काळ पूर्ण केल्यानंतर ऐच्छिक ठिकाणी बदली मिळवण्याची तरतूद शासनाने केली आहे. मात्र ऐच्छिक ठिकाण तर दूर, कुठेही द्या, पण बदली करा, असे ‘मूक आर्जव’ करण्याची वेळ या भागातील पोलीस अधिकाऱ्यांवर आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ४ तालुके वगळता इतर ८ तालुके नक्षल कारवायांसाठी संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल आहेत. नक्षलविरोधी अभियानासाठी नव्या दमाचे तरुण अधिकारी हवेत म्हणून नवप्रशिक्षित पोलीस उपनिरीक्षकांची संपूर्ण तुकडीच दर दोन ते अडीच वर्षांनी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात पाठविली जाते. याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक, निरीक्षक, राज्य पोलीस सेवेतील उपअधीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील बहुतांश अधिकाऱ्यांना सुरूवातीला याच जिल्ह्यात सेवा द्यावी लागते. सध्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील अडीच वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झालेले १४९ पोलीस उपनिरीक्षक, ३१ सहायक पोलीस निरीक्षक आणि काही निरीक्षक व उपअधीक्षक बदलीची प्रतीक्षा करत आहेत. मात्र सुरूवातीला कोरोनाकाळामुळे त्यांची बदल्यांची फाईल थांबवण्यात आली. आता इतर विभागांसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवण्यात आल्याने त्यांच्यासह राज्याच्या विविध भागात राहणाºया त्यांच्या कुटुंबियांची मानसिक स्थिती विचलित होत आहे.
बदल्यांसाठी ‘तारीख पे तारीख’अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ मे महिन्यातच पूर्ण झाला. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत बदल्या होईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ५ ऑगस्ट, १० ऑगस्ट, ५ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि आता १५ ऑक्टोबरला बदल्यांची यादी जाहीर करण्यात येईल असे सांगितले जात आहे. बदल्या खरंच करायच्या असतील तर लवकर कराव्यात, नाहीतर यावर्षी होणारच नाही, असे स्पष्टपणे सांगावे, म्हणजे आम्ही व आमचे कुटुंबिय येथे राहण्याची मानसिकता बनवू, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.