एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील गट्टा गावापासून एक किलोमीटर अंतरावरील गट्टागुडा मार्गावरच्या नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी सोमवारी सकाळी पाइपबॉम्बचा स्फोट घडवून घातपात घडविण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला; मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.अहेरी पोलीस उपमुख्यालयांतर्गत गट्टा गावाबाहेर सकाळी साडेआठच्या सुमारास पोलीस पथक गस्त घालत असताना नाल्याजवळ पाइपबॉम्बचा स्फोट घडविण्यात आला. सुदैवाने त्या स्थळापासून पोलीस काही अंतरावर असल्याने कोणतीही हानी झाली नाही.मात्र दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केल्यावर नक्षलवादी जंगलात पळून गेले.या घटनेनंतर पोलिसांनी गस्त वाढविली. तेव्हा हेडरी ते परपलगोंदी गावादरम्यान दुपारी नक्षल्यांनी स्फोटक पेरून ठेवल्याचे आढळून आले. सुमारे २५ ते ३० किलो वजनाची ही स्फोटके बाहेर काढणे शक्य नसल्यामुळे त्याचा सुरक्षितपणे स्फोट घडवून नष्ट करण्यात आली. त्या स्फोटामुळे मार्गावर मोठा खड्डा पडला आहे.
नक्षल्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला, पोलिसांच्या प्रयत्नांना मोठं यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:27 AM