मार्गदर्शन : १७२ युवक सहभागीधानोरा : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन धानोरा, केंद्रीय रिझर्व पोलीस ११३ बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा तालुक्यातील युवक, युवतींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन ५ जानेवारी रोजी करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरात अतिदुर्गम भागातील ४० युवती व १३२ युवकांनी सहभाग घेतला आहे. या शिबिराचे उद्घाटन धानोरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष वर्षा चिमूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके, सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट सपनकुमार, असिस्टंट कमांडंट स्वतंत्र कुमार, हिंगे, पोलीस निरिक्षक महेश पाटील, धानोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी पी. एस. कोल्हे, प्राचार्य बाळकृष्ण नायगमकर, प्राचार्या भारती मडावी, गणपत गुरनुले आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या ८२ जागांसाठी भरती घेतली जाणार आहे. या भरतीमध्ये दुर्गम भागातील युवक यशस्वी व्हावा, यासाठी त्यांना पोलीस भरतीबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात शारीरिक व लेखी परीक्षेबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाला आणखी युवकांची उपस्थिती वाढण्याची शक्यता पोलीस विभागाने व्यक्त केली आहे. आजपर्यंत योग्य मार्गदर्शनाअभावी काटक शरीर असलेला दुर्गम भागातील युवक पोलीस भरतीमध्ये मागे पडत होता. मात्र या शिबिराचा लाभ युवकांना होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन पीएसआय वळसंग यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
युवकांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2016 1:35 AM