गडचिरोलीः जिल्ह्यातल्या कोरची शहरातील तहसील ऑफिस रोडकडे जात असताना अचानक एका चहा टपरीवर आग लागण्याची आरडा-ओरड ऐकताच पोलीस उपनिरीक्षक थांबले व बघितले आणि हिम्मत बाळगून त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी यांनी शेजारच्या भाजीपाले दुकानदार लोकांना पोता मागून त्यात पोत्याला ओला करून त्या गॅस सिलेंडरवर टाकला त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
कोरची शहरातून तहसील ऑफिस मार्गावरील डॉक्टर नंदकिशोर शेंडे यांच्या घरासमोर ताराचंद झुमक पुराम यांची चहा टपरी आहे. गुरूवारी दुपारी गॅस पेटवताना अचानक आग लागली. यावेळी आठवडी बाजार सुरू होता. आग लागल्याचे दिसताच पळापळ झाली. हा गॅस सिलेंडर तीन दिवसांपासून लीक होत असल्याचीही तक्रार होती.
लोकांचा गलका ऐकून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी तेथे तात्काळ पोहचले. एकंदरित परिस्थिती पाहून त्यांनी गॅसचे बटन बंद केले व ओले पोते सिलेंडरवर टाकून दिले. त्यामुळे संभाव्य हानी टळली. त्यांच्या या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.