चामोर्शी तालुक्यातील स्थिती : केवळ भाजपानेच उभे केले सर्व जागांवर उमेदवार रत्नाकर बोमीडवार चामोर्शी चामोर्शी तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ग्रामीण भागात सकाळपासूनच ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचाराचा आवाज सकाळपासूनच सुरू होत आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यात राजकीय धुळवड उडाली असल्याचे दिसून येत आहे. चामोर्शी तालुक्यात सुमारे ९ जिल्हा परिषद क्षेत्र व १८ पंचायत समिती गण आहेत. केंद्रात व राज्यात सरकार असल्याने भाजपाचे कार्यकर्ते जोमात आहेत. भाजपा चामोर्शी तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा ताकदीने लढवत आहे. काँग्रेसच्या कुरूळ गणातील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. तर फराडा गणातील उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या जिल्हा परिषद क्षेत्रातील काँगे्रसच्या उमेदवारांना एकाकी लढावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी आम्ही सर्व क्षेत्रात तगडे उमेदवार देवू म्हणून सिंहगर्जना केली होती. मात्र याही पक्षाला उमेदवारांची चणचण भासली. भाजपने नाकारलेल्या दोन उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. भाजपच्या उसण्या उमेदवारांमुळे राकाँची लाज राखली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात तीन जिल्हा परिषद क्षेत्र व पाच पंचायत समिती गणात उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेन आष्टी-इल्लूर क्षेत्रात शुभांगी राकेश बेलसरे यांच्या रूपाने लढाऊ उमेदवार रिंगणात उभा केला आहे. शिवसेनेने याव्यतिरिक्त केवळ तीन जिल्हा परिषद क्षेत्र व दोन पंचायत समिती गणातच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. जनविकास मंचने ९ पैकी ७ जिल्हा परिषद क्षेत्रात व पंचायत समितीच्या १८ पैकी १४ गणात उमेदवार उभे केले आहेत. आजपर्यंत भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत होईल, असे वाटत होते. आता मात्र भाजपाला काँग्रेस, जन विकास मंचच्या उमेदवारांसोबतही सामना करावा लागणार आहे. लखमापूर बोरी-गणपूर क्षेत्रात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे यांनी अपक्ष म्हणून रणांगणात उडी घेतली. तसेच विक्रमपूर-फराडा क्षेत्रातही माजी जि. प. अध्यक्ष संध्या दुधबळे अपक्ष लढत आहेत. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील लढती रंगतदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आरोप-प्रत्यारोपाने राजकीय धुळवड
By admin | Published: February 13, 2017 1:57 AM