महेंद्र रामटेके
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमाेरी : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी आरमोरी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय भवनात २२ जानेवारीला होणार आहे. मतमोजणीसाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी १५ टेबल तयार करण्यात आले असून त्यासाठी ४० कर्मचारी मतमोजणीचे काम सांभाळणार आहेत.
आरमोरी तालुक्यातील ३२ पैकी २७ ग्रामपंचायतीच्या २१४ जागेसाठी पहिल्या टप्प्यात १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. ८५ प्रभागातून विविध संवर्गातील ४९९ पुरुष व महिला उमेदवार निवडणुकीत उभे होते. मतदान आटोपल्यावर लोकांना मतमोजणीची प्रतीक्षा व उत्सुकता शिगेला पोहचली होती. कोण जिंकणार व कोण हरणार याच्या व बेरीज वजाबाकीच्या चर्चा गावागावात सुरू असून सदर चर्चेला मतमोजणी नंतर पूर्णविराम मिळणार आहे.
२२ जानेवारीला आरमोरी येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय भवनात मतदान मोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतमोजणीसाठी एकूण १५ टेबल लावण्यात आले आहे. तसेच टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी एक स्वतंत्र टेबलही तयार करण्यात आले आहे. एकूण सहा फेऱ्यामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. तीन प्रभाग असणाऱ्या दोन ग्रामपंचायतची एका टेबलवर मतमोजणी होणार आहे तसेच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागड व वडधा या पाच प्रभाग असणाऱ्या दोन माेठ्या ग्रामपंचायतसाठी स्वतंत्र टेबल लावण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतच्या प्रभागनिहाय मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
तिसऱ्या फेरीनंतर तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतचे निकाल हाती येणार आहेत. दुपारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतमोजणी जवळ आल्याने उमेदवाराची धाकधूक वाढत आहे. मतमोजणीच्या वेळेस कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
बाॅक्स...
टेबलनिहाय अशी हाेणार माेजणी
टेबल क्रमांक १ वर शिवणी आणि त्यांनतर वासाळा, टेबल क्रमांक २ वर पिसेवडधा व डोंगरसावंगी, टेबल क्रमांक ३ वर जोगीसाखरा व देऊळगाव, टेबल क्र. ४ वर कोरेगाव व बोरीचक, टेबल क. ५ वर देलोडा (बु) व देलंनवाडी, टेबल क्र. ६ वर किटाळी व वघाळा, टेबल क्र.७ वर डोंगरगाव व मानापूर, टेबल क्र. ८ वर सायगाव व चामोर्शी (माल), टेबल क्र. ९ वर कासवी व कुलकुली, टेबल क्र. १० वर शंकरनगर व इंजेवारी, टेबल क्र. ११ वर सिर्सीचे ४ प्रभाग व चुरमुराचे २ प्रभाग, टेबल क्र. १२ वर वडधा ग्रामपंचायतच्या ५ प्रभागाची तर टेबल क्र. १३ वर वैरागड ग्रामपंचायतच्या ५ प्रभागाची मतमोजणी होणार आहे. टेबल क्र. १४ वर ठाणेगाव ग्रामपंचायतच्या ४ प्रभागांची व भाकरोंडीच्या एका प्रभागाची तर टेबल क्र. १५ वर पळसगाव ग्रामपंचायतच्या ४ प्रभागाची मतमोजणी होणार आहे.