नगर परिषदेचे दुर्लक्ष : तलावामध्ये फेकला जात आहे कचरागडचिरोली : नगर परिषदेचे कर्मचारी शहरातील कचरा डम्पिंग यार्डमध्ये नेऊन न टाकता सभोवतालच्या तलावांमध्ये नेऊन टाकत आहेत. त्यामुळे तलावांमध्ये सांडपाण्याबरोबरच कचऱ्याचीही समस्या निर्माण झाली आहे. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खरपुंडी मार्गावर १५ ते १६ एकर जागेवर डम्पिंग यार्ड आहे. नियमानुसार शहरातील कचरा याच ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. मात्र नगर परिषदेचे घंटागाडी चालक व स्वच्छता कर्मचारी वार्डामधून गोळा केलेला कचरा डम्पिंग यार्डमध्ये किंवा जवळपासच्या कचराकुंडीमध्ये नेऊन न टाकता तलावांमध्ये फेकत आहेत. लांझेडा वार्डातील आदिवासी मुलींचे वसतिगृहाजवळ असलेल्या तलावात तसेच हिरो होंडा शोरूमच्या मागे असलेल्या तलावांमध्येही कचरा फेकला जात आहे. कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे या ठिकाणी दिसून येतात. पुढे हा कचरा तलावांच्या पाण्यात कुजत असल्याने पाणी दुषीत होते. त्याचबरोबर त्याचा दुर्गंधीयुक्त वास येतो. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने कर्मचारी या ठिकाणी कचरा टाकत आहेत. या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
तलाव बनले डम्पिंग यार्ड
By admin | Published: May 08, 2016 1:16 AM