नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : सिरोंचात गोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पण; प्राणहिता व इंद्रावती नदी पुलाचे भूमिपूजन सिरोंचा : गोदावरी नदीवरील या आंतरराज्यीय पूल निर्मितीमुळे तेलंगणा, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यांचा थेट संबंध जुळला आहे. आजपर्यंत रेती घाटातून राज्याला केवळ पाच कोटीचा महसूल मिळत होता. आता गोदावरी नदीच्या पूल निर्मितीमुळे रेती घाटातून ५० कोटीचा महसूल राज्य सरकारला मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. सिरोंचा नजिकच्या गोदावरी नदीच्या पुलाचे लोकार्पण तसेच इंद्रावती व प्राणहिता नदीवरील पुलाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी जानमपल्ली येथे करण्यात आले. यावेळी नामदार गडकरी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, तेलंगणाचे रस्ते मंत्री नागेश्वरराव, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, आमदार मितेश भांगडिया आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार गडकरी म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यामुळे सदर विकास कामे करण्याची संधी मिळाली. गोदावरी नदीच्या पूल निर्मितीमुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचा डोंगराळ प्रवास संपुष्टात आला आहे. अवघ्या चार तासात हैदराबादला पोहोचता येते. प्राणहिता व इंद्रावती नदीच्या पूल बांधकामास सुरूवात झाली आहे. ते विहीत कालावधीत सुरू होणार आहे. सदर पूल निर्मितीमुळे सिरोंचा तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. शेतीला सिंचन सुविधा, शेतमालाला चांगला भाव व रोजगार निर्मिती यावर आपला भर असून गडचिरोली जिल्ह्याचे चित्र पालटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही नामदार गडकरी यांनी बोलून दाखविला. सिरोंचा तालुक्यात ड्रायव्हिंग सेंटर सुरू करणार असून त्यासाठी निधीही देऊ, या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी योजना तयार करावी, सदर प्रकल्पासाठी पाच एकर जमीन लिजवर उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी ५० हजार युवकांना रोजगार देण्यात येईल. पूल होण्यापूर्वी मी तीनवेळा ३१ डिसेंबरला सिरोंचाला मुक्काम करून १ जानेवारीला कालेश्वरचे दर्शन घेऊन नागपूरला जात होतो. नावेचा प्रवासही करीत आलो. आता पूल निर्मितीमुळे बस वाहतूक सुरू झाल्याने या भागातील प्रवास सुखकर झाला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी खासदार अशोक नेते, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, तेलंगणाचे रस्ते मंत्री नागेश्वरराव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, सिरोंचाचे नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, विभागीय आयुक्त अनुपकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर, प्रास्ताविक सी. पी. जोशी यांनाी केले तर आभार ए. श्रीवास्तव यांनी मानले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) २०१९ पर्यंत एकही गाव वीज सुविधेपासून वंचित राहणार नाही याप्रसंगी नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गडचिरोली जिल्हा विकासाचा संकल्प विकासाचा संकल्प केला असून २०१९ पर्यंत हा संकल्प पूर्ण करण्यात येईल. २०१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकही गाव वीज सुविधेपासून वंचित राहणार नाही. यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूजलाम, सूफलाम करण्यासाठी १० हजार विहिरी मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. त्यापेक्षा अधिक अर्ज आल्यास आपण निधी उपलब्ध करून देऊ, असेही नामदार मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
पूल निर्मितीने रेती घाटातून राज्य सरकारला ५० कोटींचे उत्पन्न
By admin | Published: December 31, 2016 2:27 AM