लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर ते रेगडी मार्गावरील एटावाही गावाजवळील पूल यावर्षी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेला होता. त्यामुळे चामोर्शी-घोट-कसनसूर व पुढे छत्तीसगडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. नागरिक व पोलीस जवानांनी श्रमदान करीत सदर पुलाची दुरूस्ती केली.कोटमी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भरत नागरे, पोलीस उपनिरिक्षक गिरीधर पेंदोर, प्रशांत भागवत, प्रदीप ठुबे यांनी पुढाकार घेतला. एटावाही, कोटमी, कोंडावाही गावातील नागरिकांना श्रमदानासाठी प्रवृत्त केले. नागरिकांबरोबरच पोलीस जवानांनी सुध्दा श्रमदान केले. जवळपास चार फूट उंचीचे असलेले पाईप व्यवस्थित लावले. त्यावर सिमेंट व मातीचा भराव देत पूल तयार केले. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत काम केल्याने अवघ्या दोन दिवसात पूल रहदारीसाठी तयार झाला.विशेष म्हणजे, पूल तुटल्यामुळे कसनसूर परिसरातील जवळपास २० गावातील नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. पावसाळ्यात या नाल्यावर पाच फुटापेक्षा अधिक पाणी राहत असल्याने वाहतूक होणे अशक्य होते. परिणामी या परिसरातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण व इतर सुविधा मिळण्यास अडचण निर्माण होणार होती. पोलिसांनी पुढाकार घेत मार्गाची दुरूस्ती केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या या सामाजिक कार्याचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
नागरिक व जवानांच्या श्रमदानातून पूल दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:36 PM
एटापल्ली तालुक्यातील कसनसूर ते रेगडी मार्गावरील एटावाही गावाजवळील पूल यावर्षी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेला होता.
ठळक मुद्देएटावाही नाल्यावरील पूल : २० गावातील नागरिकांसाठी सोयीचे