या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तर आहेतच; पण बारीक गिट्टी, चुरी, डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली असल्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना धुळीमुळे वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. अपघात होण्याचीही शक्यता बळावली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले असता काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती; पण तेव्हापासून आतापर्यंत जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाल्याचे निदर्शनास येत आहेत. काही ठिकाणच्या रस्त्यावर बारीक डांबर उखडून खडी रस्त्यात पसरली आहे. त्यामुळे येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनधारकांचे वाहन घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागासोबत या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नसल्याचा आरोप या परिसरातील काही सुज्ञ नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे भेंडाळा - अनखोडा मार्ग हा अतिशय अरुंद असा आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांसोबत लहान वाहनांना सुद्धा ये - जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असते. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे.
भेंडाळा-अनखोडा मार्गाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:37 AM