लाेकमत न्यूज नेटवर्क
चामाेर्शी : चामोर्शी ते चाकलपेठ बसस्टॉप या ४ किलोमीटर अंतराच्या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
चामाेर्शी-हरणघाट हा दाेन जिल्ह्यांना जाेडणारा मार्ग आहे. चामाेर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल व सावली तालुक्यात विविध कामांसाठी जातात. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यापैकी चामाेर्शी ते चाकलपेठ या मार्गावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. एखादे वाहन गेल्यानंतर माेठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने, दुचाकीस्वारांना वाहन चालविणे कठीण हाेते. रस्त्यावर एवढ्या माेठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत की, या खड्ड्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.