भामरागड : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ते हिंदेवाडा या मार्गाची खड्ड्यांमुळे वाताहात झाली आहे. हा मार्ग पूर्णत: उखडला असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुका मुख्यालयाशी जोडण्याकरिता १९९८ मध्ये या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्यामुळे अतिदुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याची मोठी सोय झाली. परंतु, देखभाल व दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले. मागील २० वर्षांच्या कालावधीत एकदाही या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे डांबर पूर्णपणे निघून गेले आहे. गिट्टी बाहेर पडली आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना नागरिकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मार्ग दुरुस्त करावा, अशी मागणी यापूर्वीही अनेकवेळा करण्यात आली आहे. मात्र, बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.