चामाेर्शी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती करावी लागत आहे. सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
अनेक वाॅर्डातील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघाताची शक्यता आहे.
दुर्गम भागात कर्मचारी राहातच नाहीत
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्यांच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहतच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.
चपराळा येथे सोयीसुविधा पुरवा
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र, या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे. चपराळा येथे भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे.
कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविली जात होती. आता मात्र या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.
बांधकाम साहित्यामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरात विविध भागात घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख, आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र, याकडे न.प.चे दुर्लक्ष होत आहे.
हूक टाकून विजेची चोरी सुरूच
वैरागड : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरातूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे.
उपाहारगृहांमधील पदार्थ उघड्यावर विक्रीला
गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयांतील उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, याकडे अन्न व पुरवठा विभागातर्फे कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
लिलावाअभावी वाहने गंजण्याची शक्यता
गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यांमध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ठाण्यातील वाहनांची संख्याही वाढत चालली आहे.
रेडियमअभावी अपघाताची शक्यता
देसाईगंज : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम लावले नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्यावेळी समोरील रस्ता दिसत नाही.