पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले, परंतु स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मध्यवर्ती गाव आहे. येथील विश्रामगृह अतिशय जुने आहे.
भामरागड तालुक्यातील गावे लाइनमनअभावी
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते, परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठ्याची समस्या आहे.
सिंचन सुविधेचा अभाव
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, परिसरात सिंचनाची सुविधा नसल्याने धान पीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.
निवारा शेडचा अभाव
जाेगीसाखरा : तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य परिवहन मंडळाने गावागावात पाहणी करून निवारा शेड उभारावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, पावसाळा, तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पार्किंगची समस्या भारी
देसाईगंज : मुख्य रहदारीच्या आरमोरी-कुरखेडा मार्गावर वाहन चालक वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे येथील रहदारीस अडथळा होत आहे, शिवाय त्याचा व्यापाऱ्यांसोबतच ग्राहकांनाही त्रास होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणधारक व्यावसायिकांवर कारवाई करावी.
खुटगावात निवारा बांधा
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने, सध्या प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथे नवीन प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.