लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १९१ गावांमधील विहिरींची पाणी पातळी एक ते दोन मीटर पर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषीत केली असून त्यामध्ये सर्वाधिक गडचिरोली तालुक्यातील ४४ गावांचा समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पर्जन्यमान अधिक आहे. त्याचबरोबर भूगर्भातील पाण्याचा उपसाही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ गडचिरोली जिल्ह्याला कमी प्रमाणात बसत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. प्रामुख्याने एप्रिल महिन्यापासून थोडीफार पाणी टंचाई निर्माण होण्यास सुरूवात होऊन ती मे व जून या कालावधीपर्यंत कायम राहते. मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणे टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल, अशी भयानक स्थिती राहत नाही.गडचिरोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १०११.३३ मिमी एवढे आहे. मात्र २०१७ च्या पावसाळ्यात सरासरी पेक्षा ३४३.४५ मिमी कमी पर्जन्यमान झाले. याचा परिणाम यावर्षीच्या उन्हाळ्यात दिसून आला. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यानंतर पावसाने कायमची विश्रांती घेतली. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होऊन यावर्षी पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईची झळ काही गावांना बसण्यास सुरूवात झाली.पाणी टंचाईग्रस्त गावे घोषीत करण्याबाबत तीन टप्पे पाडले जातात. यामध्ये पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीचा आहे. या कालावधीत भूजल पातळी सरासरीपेक्षा चार मीटरने कमी झाल्यास सदर गावे टंचाईग्रस्त मानली जातात. मात्र या निकषात गडचिरोली जिल्ह्यातील एकही गाव मोडले नाही. जानेवारी ते मार्च २०१८ या दुसऱ्या टप्प्यातही गडचिरोली जिल्ह्यातील एकही गाव टंचाईग्रस्त नाही. तिसरा टप्पा एप्रिल ते जून या कालावधीतील आहे. या टप्प्यात भूजल पातळी एक ते दोन मीटरने घटल्यास सदर गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषीत केली जातात. यानुसार १९१ गावांमधील भूजलाची पातळी एक ते दोन मीटरने घटली असल्याने या गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई प्रशासनाने जाहीर केली आहे. या गावांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे.रूपांतरीत खडकामुळे भूजलसाठा वाढीस अडचणगडचिरोली जिल्ह्याचा भूभाग प्रामुख्याने रूपांतरीत खडकाने बनला आहे. सदर खडकाची खोली २० ते ३० मीटर एवढे आहे. सदर खडकात अत्यंत कमी प्रमाणात छिद्र राहतात. त्यामुळे पाण्याचे वहन होत नाही. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याच्या भूगर्भात मातीचे प्रमाण अधिक आढळते. मातीसुध्दा पाणी साठवून ठेवत असली तरी वहन करत नाही. माती व खडकाच्या गुणधर्मामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विहिरी पावसाळ्यात तुडूंब भरतात. मात्र पावसाळा संपताच कोरड्या पडण्यास सुरूवात होते. सुदैवाने पर्जन्यमान अधिक आहे व भूगर्भातील पाण्याचा उपसा कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाई पाहिजे त्या प्रमाणात निर्माण होत नाही.तीव्र पाणी टंचाई नाहीज्या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे घोषीत करण्यात आले आहेत. त्या गावांमधील पाणी पातळी दोन मीटरपेक्षा कमी झाली नाही. त्यामुळे सदर गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
१९१ गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 11:17 PM
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १९१ गावांमधील विहिरींची पाणी पातळी एक ते दोन मीटर पर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषीत केली असून त्यामध्ये सर्वाधिक गडचिरोली तालुक्यातील ४४ गावांचा समावेश आहे.
ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाचा निष्कर्ष : उन्हाळ्यात भूजल पातळी एक ते दोन मीटरने घटली