कुरूड येथे प्रात्यक्षिक : आमदार व शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत सुसंवाद कार्यक्रम देसाईगंज : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत कुरूड येथे मल्चिंगवर लागवड केलेले प्रात्यक्षिक पीक कापणी प्रयोग व शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मल्चिंगवरील धानाची कापणी आमदार क्रिष्णा गजबे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कुरूड येथील शेतकरी हरिदास गणवीर यांच्या शेतावर मल्चिंगवर धान लागवड केलेल्या प्रात्यक्षिकाचे पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. या कार्यक्रमात एक वर्ग मीटरचे पाच ठिकाणी रॅडम प्लाट टाकून आमदार क्रिष्ण गजबे यांच्यासह नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे तांबे यांनी प्रत्यक्ष शेतावर धानाची कापणी केली. यावेळी प्रास्ताविकेतून डॉ. पवार यांनी मल्चिंगवर धान लागवडीचे फायदे सांगून शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले. मल्चिंग पेपरवर धान लागवड तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानकडून माहिती घेऊन उत्पादन घ्यावे, तसेच शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन आ. क्रिष्णा गजबे यांनी केले. मल्चिंग पेपरचा वापर करून भाजीपाला व इतर पिकांचे अधिक उत्पादन घेतले जाते. आत्मामार्फत राबविल्या जाणऱ्या या प्रात्यक्षिकाचा वापर शेतामध्ये करावा, असे आवाहन घावटे यांनी केले. यावेळी परसबाग, मिनीकीट माहिती लिपलेट, सेंद्रीय शेती माहिती पुस्तिका, मल्चिंग भात लागवड पुस्तिका, अश्वागंध लागवड पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी आत्माच्या उपसंचालक प्रीती हिरडकर, विषय विशेषतज्ज्ञ प्रा. योगीता सानप, उपविभागीय कृषी अधिकारी काकडे, तालुका कृषी अधिकारी गोथे, कृषी अधिकारी धेडे, शहारे, जनबंधू, लांजेवार, जांभुळकर, पेदापल्लीवार, जिरित्कार, दहेगावकर, बन्सोडे, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. संचालन दोनाडकर तर आभार टेंभूर्णे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
मल्चिंगवरील धानाचे कापणी प्रात्यक्षिक
By admin | Published: December 31, 2016 2:30 AM