गडचिराेली : केंद्र शासनामार्फत वीज कायद्यात दुरुस्ती करून नवीन वीज कायदा आणणार आहे. हा कायदा अन्यायकारक असल्याचा आराेप करून सबऑर्डिनेटर इंजिनिअर असाेसिएशन व वर्कर्स फेडरेशनच्या सदस्यांनी एक दिवसाचा संप करून कामबंद आंदाेलन केले.
महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्रात अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण कराव्यात. सामान्य जनतेच्या हिताचे धाेरण आखावे, जुनी पेन्शन याेजना लागू करावी, केंद्रशासित प्रदेशात प्रस्तावित विद्युत क्षेत्राचे खासगीकरण करू नये, सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व फ्रेन्चायजी रद्द कराव्यात, सर्व कंत्राटी कामगारांना कायम करावे आदी मागण्यांसाठी एक दिवसाचा संप पुकारण्यात आला. वीज कर्मचारी व अभियंत्यांनी पाेटेगाव मार्गावरील महावितरणच्या कार्यालयात निदर्शने केली. दाेन्ही संघटनांनी द्वारसभेचे आयाेजन केले हाेते. यावेळी सबऑर्डिनेटर इंजिनिअर्स असाेसिएशन गडचिराेलीचे सहसचिव पुरुषाेत्तम वंजारी, मंडळ सचिव नरेश बुरडकर, वर्कर्स फेडरेशनचे मंडळ अध्यक्ष उदयराज पटालिया, मंडळ सचिव संजय साेनुले, घनश्याम लडके यांनी सभेला मार्गदर्शन केले.