गडचिरोली : वननाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरूस्तीसह रूंदीकरण करावे. मागील अनेक वर्षांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.
वडधात अनियमित वीज
वडधा : येथे मागील आठ दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवारी सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत तो पूर्ववत झाला नाही. हा प्रकार अलिकडे वारंवार होत आहे.
खर्रा पन्नीवर बंदी आणण्याची मागणी
जोगीसाखरा : जोगीसाखरा गावासह आरमोरी तालुक्यात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्नीचा वापर केला जातो. या पन्या रस्त्यावर फेकून दिल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. कारवाई हाेत नसल्याने अनेक व्यावसायिक पन्नीचा सर्रास वापर करतात.
विद्युत केंद्रांअभावी पुरवठ्याची समस्या
सिरोंचा : अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. परिणामी नवीन ३३ के. व्ही. उपकेंद्र निर्मितीची मागणी आहे. वीज समस्या साेडविण्यासाठी केंद्रांची निर्मिती करावी, अशी मागणी हाेत आहे.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.
वाहतुकीस येताहे अडसर
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरूस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
रेखेगाव मार्ग खड्ड्यात
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. सदर मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मार्गावर अनेक किरकोळ अपघात यापूर्वी घडले आहेत.
पशु विभागातील पदे रिक्त
एटापल्ली : पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होण्यास अडथळे निर्माण होत आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे पशु विभागातील रिक्त पदे लवकर भरावी, अशी मागणी हाेत आहे.
अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीज पुरवठा होता. मात्र वीज बिल भरला नसल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.
वन जमिनीवर अतिक्रमण
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी हाेत आहे.
स्वच्छतागृहाचा अभाव
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे या ठिकाणी स्चच्छतागृह उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देसाईगंजात वाढले डास
देसाईगंज : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून अनेक आजार पसरत आहेत. म्हणून डास निर्मूलनासाठी फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. डासांमुळे विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फवारणी करावी, अशी मागणी आहे.
मंद इंटरनेटचा त्रास
कुरूड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
जनावरांमुळे रहदारी बाधित
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहन धारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.