गुडीगुडम : अहेरी तालुक्याच्या राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला असल्याने नागरिक त्रस्त आहेत. हलक्याशा वादळाने वीजपुरवठा तासन्तास खंडित होतो. मात्र या समस्येकडे दुर्लक्ष हाेत आहे.
जिमलगटा येथून गुडीगुडम व राजाराम परिसरात वीजपुरवठा केला जातो. गुडीगुडम ते जिमलगट्टा यामधील अंतर जवळपास ३० ते ३५ किमी आहे. जिमलगट्टा ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. त्या वीज उपकेंद्रामध्ये जिमलगट्टा, देचलीपेठा, उमानूर, मरपल्ली तसेच रेपनपल्ली, कमलापूर, राजाराम, गुडीगुडम अशा तीन ते चार बाजूंना वीजपुरवठा करावा लागतो. हा परिसर खूप मोठ्या क्षेत्रफळात व्यापला आहे. एवढ्या मोठ्या परिसराला वीजपुरवठा करणे शक्य होत नाही आहे. त्यामुळे वीज उपकेंद्रावर जास्तीचा भार पडत आहे.
हलकासा पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो.
पूर्वी या परिसरात तीन ते चार वीज कर्मचारी (लाइनमन) असायचे. त्यावेळी वीज ग्राहक कमी होते. आता वीज ग्राहक वाढले व वीज कर्मचारी (लाइनमन) कमी झाले.
सध्या एक स्थायी कर्मचारी व दोन रोजंदारी कर्मचारी आहेत. वीजपुरवठा घनदाट जंगलातून असल्याने कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यास विलंब होतो. त्यामुळे वीजपुरवठा भूमिगत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कमलापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्मितीसाठी मंजुरी मिळाली; मात्र आत्तापर्यंत थांगपत्ता नाही.