सिराेंचा : शहरातील नवीन वस्त्यांमधील अनेक नागरिकांनी २०० ते ३०० मीटरवर केवळ सर्व्हिस वायरच्या माध्यमातून वीज पुरवठा घेतला आहे. हा वीज तार धाेकादायक ठरू शकते.
भ्रमणध्वनीसेवा झाली विस्कळीत
झिंगानूर : परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील आठ दिवसांपासून ठप्प पडली आहे. वेळाेवेळी फाेन कटत असल्याने माेबाईलधारकांचे पैसे अनावश्यक संपत आहेत. सेवेत सुधारण्याची गरज आहे.
नदीवर बंधारा बांधा
वैरागड : वैरागडजवळून वाहणाऱ्या सती नदीवर बंधारा बांधल्यास परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध हाेण्यास मदत हाेईल. सिंचन विभागाने यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे वैरागड परिसरात एकही माेठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे बंधाऱ्याची गरज आहे.
मुख्यालय सक्तीचे करा
आलापल्ली : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे. वीज कर्मचारी मुक्कामी राहिल्यास सेवा मिळेल.
सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाज बांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक मतदान करतात.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. त्यामुळे या तलावात आता अतिक्रमण वाढले असून, अस्वच्छता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात आहे.
गावांमध्ये निस्तार डेपो देण्याची मागणी
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही. परिणामी नागरिकांना जळाऊ लाकूड उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे.
शेतजमिनी होत आहेत अकृषक
गडचिराेली : शेतजमिनी अकृषक करून तेथे प्लॉट पाडण्यात येत असल्यामुळे जमिनीचे भाव वाढले आहेत. शहरातील काही ठराविक मंडळी जमिन खरेदी करण्यासाठी शेत मालकावर दबाव टाकत आहे. चांगल्या जमिनी व्यावसायिकांच्या घशात जात आहे. गडचिरोली शहरासह देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी येथे शेतजमिनीचे भूखंड तयार केले जात आहेत.
पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
जिल्ह्यात रोजगारभिमुख तंत्रशिक्षणाचा बट्ट्याबोळ
देसाईगंज : कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर तंत्रशिक्षण संस्था निर्माण केल्या असल्या तरी, यातील अभ्यासक्रम पूर्णपणे कालबाह्य झाले आहे. त्याचबरोबर यातील अनेक पदे रिक्त आहेत.
जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करा
कुरखेडा : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यांमध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.
खुल्या जागांची दैनावस्था कायम
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते.
ग्रामीण भागातही पशुधन घटले
एटापल्ली : यंत्रांचा वापर वाढल्याने पशुधनाचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे पशुधन घटत चालले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता केवळ २५ टक्के पशुधन गावात शिल्लक असल्याचे दिसून येते. ही अतिशय गंभीर बाब आहे.
रस्त्यालगत वाहनांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री सुरूच
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
शहरातील अनेक वाॅर्डात सट्टापट्टी जोमात
देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. मात्र याकडे देसाईगंज पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सकाळपासूनच सट्टापट्टी लावण्यास सुरुवात होते.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने हे साहित्य धूळ खात पडून आहे. काही शाळांना वीज पुरवठा होता; मात्र वीजबिल भरले नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीज पुरवठा आवश्यक झाला आहे.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कतलीसाठी जात असलेली जनावरे पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जि. प. समोरील अतिक्रमण वाढतीवरच
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत; मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.
सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून, याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही टाकतात.
मालेवाडा परिसर समस्यांच्या गर्तेत
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. आरोग्य सेवा सुधारण्याची तसेच वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी
गडचिरोली : गडचिरोली शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे. नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी कठडे लावून बंदी घातली होती. मात्र त्याची अंमलबजावणी हाेत नाही.