२० खांब लावले : अतिक्रमणाला प्रोत्साहन गडचिरोली : शहरातील लांजेडा, स्नेहनगर व तलावात मोठ्या प्रमाणात धनदांडग्यांनी अतिक्रमण करून सदर जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अतिक्रमणधारकांना विद्युत पुरवठाही दिला असल्याचा आरोप बजरंग दल गडचिरोलीच्या वतीने करण्यात आला आहे. गडचिरोली शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. शासकीय जमिनीवर काही दिवस अतिक्रमण करून त्या जागेवर घर बांधले जाते. किंवा सदर जागा लाखोच्या किमतीने दुसऱ्याला विकली जाते. मात्र प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांची हिंमत वाढत चालली आहे. ज्यांना स्वत:चे घर, प्लॉट, शेती आहे, असेही नागरिक अतिक्रमण करीत आहेत. अतिक्रमीत घर मालकाला प्रशासनाकडून सोयीसुविधाही पुरविल्या जात आहेत. विद्युत विभागाने अतिक्रमीत जागेवर २० विद्युत खांब लावून दिले. यामुळे अतिक्रमणाला प्रशासनाकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे. हा गंभीर प्रकार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)
अतिक्रमणधारकांना विद्युत पुरवठाही दिला
By admin | Published: March 13, 2017 1:28 AM