नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध भागात व चौकात हायमास्ट व पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आरमोरी शहर लक्ख प्रकाशाने उजळून निघत आहे. मात्र, काही ठिकाणी रात्री पथदिवे बंद असतात, तर काही ठिकाणी अधूनमधून दिवसाही सुरू राहत असतात. दिवसाही पथदिवे सुरू असल्याचा प्रकार शनिवारी ताडुरवारनगरात पहायला मिळाला. नगर परिषदेच्या दिवाबत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री सुरू केलेले पथदिवे व हायमास्ट शनिवारी सकाळी बंद न केल्यामुळे ते दुपारपर्यंत सुरूच होते. विजेचा तुटवडा, तरीही विजेची बचत न करता विनाकारण भरदिवसा लाइट सुरू ठेवण्याच्या प्रकाराने विजेचा अपव्यय होत आहे. सदर प्रकारामुळे नगर परिषदेचे अधिकारी तथा संबंधित विभागाचे सभापती यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश नाही का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात घाेळत आहे. विशेष म्हणजे, शनिवारी दिवसा पथदिवे व हायमास्ट सुरू असल्याचा प्रकार काही नागरिकांनी नगर परिषदेच्या लक्षात आणून दिल्यानंतर दुपारी लाइट बंद करण्यात आले. सदर प्रकाराकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
ताडुरवार नगरात विजेचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:35 AM