कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याची बाधा होऊ नये म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून त्यांना पीपीई किट वापरण्यासाठी देण्यात येते. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरलेली पीपीई किट आरमोरी-वडसा रोडवरील कासवी फाट्याजवळ बेवारस स्थितीत फेकण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. सदर प्रकाराने संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही किट नेमकी कुणी फेकली, हे अद्यापही कळले नाही. मागील वर्षीसुद्धा अशीच किट याच रोडवर फेकण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे.
आरमोरी-वडसा मार्गालगतच्या जंगलात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. तसेच या मार्गाने ये-जा करणाऱ्याची संख्याही जास्त आहे. तसेच वेडसरपणे फिरणारे लोक कुतूहलाने ती किट उचलून वापरू शकतात. अशा बेवारस फेकलेल्या किटमुळे माणसासह वन्यप्राणी, चराईसाठी फिरणारी गुरे यांनाही आजाराचा धोका होऊ शकतो. कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या पीपीई किट वापरण्यात आल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावायला पाहिजे. मात्र रहदारीच्या रस्त्यावर बेजबाबदारपणामुळे किट फेकणे हा प्रकार संतापजनक आहे. आरोग्य विभागाने सदर प्रकाराची दखल घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
बाॅक्स :
वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेवारस किटची विल्हेवाट
आरमोरी-वडसा रोडच्या अगदी कडेला पीपीई किट फेकण्यात आल्याची माहिती मिळताच कासवीचे माजी उपसरपंच प्रवीण राहाटे यांनी सदर प्रकाराची माहिती तहसीलदार कल्याणकुमार दहाट याना दिली. वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती बेवारस किट जाळून तिची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी प्रवीण राहाटे, वनरक्षक सलीम सय्यद, कृष्णा मत्ते, धनवान डोनाडकर, अशोक प्रधान, मयूर पुराम आदी उपस्थित होते.