प्रभाकर शेंडे यांचा जन्म १९५३ रोजी मुरखळा येथे झाला. वडील सोमजी हे घरी दगडापासून पाटे,जाते तयार करीत असत. त्यामुळे प्रभाकरला दगडाव कोरीव काम करण्याची कला वडिलांकडून मिळाली. त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र देवीदेवतांची मूर्ती तयार कशी करायची यासाठी त्यांनी जवळच असलेल्या व अकराव्या शतकाची साक्ष देण्याऱ्या मार्कडादेव येथील मंदिरावर असलेल्या शिल्पकलेचा बारकाईने अभ्यास करून दगडावर कोरीव काम करण्याची कला अवगत केली. यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय यांच्याकडून ४ मे १९८७ ला रितसर दगड कोरीव कामाची परवानगी मागून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी दगडावरील कोरीव कामाला सुरूवात केली. सुरूवातीला त्यांना दगड मिळवण्यासाठी अडचणी येत. परंतु यावर सुद्धा त्यांनी मात केली. जिल्हा उद्योग केंद्राने त्यांच्या कलेची दखल घेतली आहे. दगडावर कोरीव काम करणे अतिशय कठीण असते, मात्र प्रभाकर यांनी जिद्दीने ही कला अवगत केली. मूर्ती कलेत त्यानी आजवर देवीदेवतांच्या अनेक मूर्ती तयार केल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या मूर्ती जिल्ह्यातच नव्हे तर चंद्रपूर, वर्धा यासह अन्य जिल्ह्यात मूर्ती पाेहाेचविल्या.वयाेमानानुसार ते वार्धक्याकडे वळले. तसेच पत्नी विरह सुद्धा आहे. परंतु मूर्ती कलेवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. दगडाला आकार देऊन त्यात जिवंतपणा ओतण्याचा प्रयत्न सुरूच आहे. तरुणांना लाजवेल अशी कामे आजही प्रभाकर करीत आहेत. मात्र ही कला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने गुणी कारागिरांना मानधन दिले तर वार्धक्यातील अर्थार्जनाची समस्या सुटू शकते, अशी आशा ते बाळगून आहेत.
प्रभाकर शेंडे यांची मूर्तिकला पाेहाेचली परजिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:35 AM