लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा : ज्ञानात भर पडून आत्मविश्वास वाढल्याची भावनालोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जेमतेम १२ वर्षे वयात ‘लोकमत’च्या खर्चातून घडवून आणलेला नागपूर ते दिल्ली विमान प्रवास, राजधानीतील संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंतच्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी आणि देशाच्या सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीची भेट आणि त्यांच्याशी झालेला संवाद, यामुळे गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याचा विद्यार्थी प्रथमेश रमेश बोरकुटे चांगलाच भारावून गेला. गुरूवारी त्याने लोकमत कार्यालयात आपल्या या अविस्मरणीय हवाई सफरीचे अनुभव कथन केले.दरवर्षी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने शालेय सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी ‘संस्कारांचे मोती’ ही अनोखी स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत शालेय आणि जिल्हास्तरावरील विविध बक्षिसांसोबतच जिल्ह्यातून एका विद्यार्थ्याला लोकमततर्फे हवाई सफर घडविली जाते. गेल्यावर्षीच्या स्पर्धेतून हवाई सफरसाठी निवड झालेल्या गडचिरोलीच्या स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गातील विद्यार्थी प्रथमेश रमेश बोरकुटे याच्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्याची बुधवारी (दि.२१ जून) राजधानी दिल्लीला हवाई सफर घडविण्यात आली.याबद्दल आपला अनुभव सांगताना प्रथमेश म्हणाला, मी चौथीत असतानापासून लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेत सहभागी होत आहे. आता लहान भाऊ ओंकार हा पण दरवर्षी सहभागी होतो. या स्पर्धेदरम्यान लोकमतमध्ये प्रकाशित होणाऱ्या माहितीतून खूप काही शिकायला मिळते. ही माहिती खूप कामाची असल्यामुळे संग्रही ठेवतो. विशेष म्हणजे कोणताही भेदभाव न करता लकी ड्रॉ मधून बक्षीसे काढली जात असल्यामुळे सर्वांना संधी मिळते, असे तो म्हणाला.हवाई सफरमध्ये नंबर लागल्याचे कळल्यानंतर खूप आनंद झाला. पहिल्यांदाच विमानात बसत असल्यामुळे आधी थोडी भितीही वाटत होती. पण विमान उडाल्यानंतर भिती दूर पळाली. आम्ही खूप मजा केली. नागपूरवरून सकाळी ७.४० ला उडालेले विमान ९ वाजताच्या सुमारास दिल्लीला पोहोचलो. सर्वप्रथम रेल्वे म्युझियम पाहिले. त्यानंतर इंदिरा गांधी म्युझियम, महात्मा गांधींची समाधी असलेल्या राजघाटवर भेट दिली. नंतर संसद भवन आतमध्ये जाऊन पाहिले. तेथून राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटलो. त्यांनी आम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेथून उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना भेटण्यासाठी गेलो. त्यांच्या भेटीनंतर शेवटी इंडिया गेटला भेट देऊन विमानतळाकडे रवाना झालो, असे प्रथमेशने सांगितले.उपराष्ट्रपतींनी केले ‘संस्काराच्या मोती’चे कौतुक‘लोकमत’कडून आलेल्या बालकांना पाहून उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनाही आनंद झाला. त्यांनी सर्व बालकांना पाहुण्यांच्या कक्षात अल्पोपहार करविला. यावेळी अन्सारी यांनी सर्वांशी संवादही साधला. त्यांनी लोकमत संस्काराचे मोती या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर या स्पर्धेबद्दल लोकमतचेही कौतुक केले. मुलांना हवाई सफर कसा वाटला, याचीही आस्थेने विचारपूस करून सर्वाना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.एवढ्या मोठ्या लोकांशी भेट झाल्याचा आनंदलोकमतने घडविलेली ही अनोखी हवाई सफर आमच्या ज्ञानात भर पाडणारी आणि आत्मविश्वास वाढविणारी ठरली. राष्ट्रपती-उपराष्ट्रपतीसारख्या लोकांशी एवढ्या कमी वयात भेट होईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. देशाचा कारभार चालविणारे संसद भवन आतमध्ये जाऊन पहायला मिळाले. खूप आनंद वाटून समाधान झाले. ही संधी लोकमतने दिल्याबद्दल लोकमतचा खूप आभारी आहे, अशी भावना प्रथमेशने व्यक्त केली.
विमानप्रवास आणि राष्ट्रपतींच्या भेटीने भारावला प्रथमेश
By admin | Published: June 23, 2017 12:50 AM