खरिपातील पीक लागवड करण्यासाठी शेतकरी दरवर्षी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज घेत असतात. यंदा अजूनही पीक कर्ज वाटप झाले नसल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे. त्यातच महागाईने डोके वर काढत बी-बियाणे, रासायनिक खत, डिझेल आदींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे यावर्षी खरीप पीक लागवडीचा खर्च वाढणार आहे. अशाही परिस्थितीत एक परंपरागत व्यवसाय म्हणून शेतकरी शेती करीत आहे. उत्पादित शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना अजूनही बोनस मिळाला नाही, अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे. शेतातील केरकचरा, साफसफाई यासोबतच नांगरणीचे काम करून जमीन पेरणीलायक केली आहे. मात्र, सध्या पावसाचा रोहिणी नक्षत्र सुरू आहे. त्यामुळे पेरणीयोग्य पावसाची या नक्षत्रात अपेक्षा कमी आहे. हवामान खात्यानुसार पाऊस १ ते ५ जूनदरम्यान मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. शेतकरी महागडे बियाणे दरवर्षी खरेदी करीत असतात. त्यामुळे पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत असतात. पुढे दुबार पेरणी करण्याची पाळी येऊ नये, असा शेतकऱ्यांचा समज झाला आहे. तालुक्यातील शेतकरी आवत्या व रोवणी पद्धतीने धान पिकांचे उत्पादन घेत असतात. यातही तालुक्यातील बराच भाग वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. काही भागात सिंचन सुविधा उपलब्ध आहे. अशातही सिंचन सुविधा असूनही दरवर्षी एका पाण्याने पीक हातून जात असते. पीक गर्भावस्थेत असताना दरवर्षी करपा, मावा, तुडतुडा आदी राेग पिकांवर ठरलेली आहेत. त्यामुळे उत्पादन घटत चालले असून पीक लागवड खर्चही निघत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय सध्या तोट्यात आला आहे.
बाक्स :
बियाणांबाबत पंचायत समितीचे नियाेजन शून्य
दरवर्षी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पंचायत समिती स्तरावरून बी-बियाणे मिळतात. यात तूर व धान बियाणे दिली जात होती. मात्र, यावर्षी संबंधित विभागाचे खरीप हंगाम तोंडावर असतानासुद्धा कोणतेही नियोजन दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणांच्या वाढत्या किमतीचा सामना करावा लागणार आहे. अवकाळी पाऊस अधूनमधून येत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांना नांगरणीचे काम करण्यास सोयीस्कर होऊन शेतकरी शेतजमीन नांगरणी करून दमदार पावसाची पेरणीसाठी वाट बघताना दिसून येत आहेत.